कर्जतच्या बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षेची ऐशीतैशी !

महामार्गाच्या कामावर माहिती फलक, परावर्तकांचा अभाव ; अपघाताचा धोका

कर्जत – अमरापूर-बारामती या चौपदरी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करून मुरुमीकरणाचे काम अहोरात्र केले जात आहे. मात्र शासकीय नियमांना तिलांजली देत प्रवाशांच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अमरापूर-बारामती या महामार्गाचे काम कर्जत, राशिन, खेड, भिगवण या मार्गावर सध्या वेगाने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी मशीनने खोदाई करून, त्यात मुरूम भरून रोलिंग केले जात आहे. महामार्गावरून अवजड वाहतूक केली जाणार असल्याने, चार-पाच फूट खोलीपर्यंत खोदाई करून त्यात मुरूम भरला जात आहे. खोदाईनंतर मुरूम भरण्यासाठी काही दिवस जात असल्याने, खोल चारी तशीच राहते आहे.

या कालावधीत प्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला पांढऱ्या रंगाची निशाणी, फिती तसेच परावर्तक लावणे, काम सुरु असल्याबाबतचे माहितीफलक लावणे आवश्‍यक आहे. शासनाकडून ठेकेदारांना काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत लेखी सूचित केले जाते. मात्र याबाबत संबंधित ठेकेदाराकडून दक्षता घेतली जात नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. मोठी रहदारी असलेल्या या राज्यमार्गावर दुचाकीस्वारांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याची खोदाई झाल्याचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात पडून अपघात होण्याचा मोठा धोका आहे. रात्रीचा प्रवास करण्यासाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे.कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या हद्दीतील कामाबाबत दक्षता घेणे, ठेकेदाराला त्यासंदर्भात सूचना देणे अपेक्षित आहे. मात्र याबाबत कसलेच पाऊल उचलले जात नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. कोळवडी ते खेड या टप्प्यात धोकादायक पद्धतीने काम सुरू आहे.

सुरक्षेचे नियम झुगारून होत असलेल्या कामामुळे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले यांच्या कार्यालयास भेट देऊन, तसेच फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

“सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. तालुक्‍यातील कित्येक कामे मुदतबाह्य झालेली असतानाही अधिकारी ठेकेदारांना पाठिशी घालत असल्याचे दिसते. महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास कामाच्या ठिकाणीच आंदोलन केले जाईल.
– भाऊसाहेब तोरडमल ,अध्यक्ष, श्रीसंत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान, कर्जत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)