भरपूर पाऊस पडू दे…

कर्जतच्या श्री गोदड महाराज रथोत्सवात भाविकांची प्रार्थना

कर्जत – कर्जतचे ग्रामदैवत श्री सदगुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रा उत्सवास बुधवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गोदड महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. यंदा अडीच महिने उलटूनही पावसाने हुलकावणी दिल्याने “भरपूर पाऊस पडू दे’, अशी प्रार्थना भाविकांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री सद्‌गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रा उत्सवानिमित्त मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अभिषेक घालण्यास सुरुवात केली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पोलीस दलाच्या वतीने अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक भगवा ध्वज अर्पण केला.तहसीलदार किरण सावंत-पाटील व यात्रा कमिटीचे मेघराज पाटील यांच्या हस्ते मानाची पूजा करण्यात आली.

मूर्तीला फुल लावून यात्रेस दुपारी सुरुवात झाली. यावेळी सर्व मानकरी, सेवेकरी उपस्थित होते. रथयात्रेनिमित्त गावोगावच्या दिंड्या कर्जतला आल्या आहेत. गोदड महाराजांचा गजर करत दिंड्या यात्रोत्सवात सहभागी झाल्या.राज्याच्या विविध भागातील लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दोरखंडाद्वारे रथ ओढण्यासाठी भाविक मनोभावे सक्रिय झाले होते.

गोदड महाराजांचा तीन मजली भव्य रथ “सद्‌गुरू गोदड महाराज की जय’चा जयघोष होताच ग्रामप्रदक्षिणा करीत निघाला. रथावर नियंत्रण ठेवण्याचा मान शहरातील लोहार व सुतार समाजाकडे परंपरागत आहे. त्यास मोठ्या आनंदाने हे दोन्ही समाज दरवर्षी पार पाडत असतात. रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समाजाकडे, तर डाव्या चाकाचा मान सुतार समाजाकडे आहे. रथाला अरुंद रस्त्यावरून, वळणावरून, डांबरी रस्त्यावरून व्यवस्थित सरळ पुढे नेणे हे जिकिरीचे व कौशल्याचे काम असते. या दोन्ही समाजातील अनेकजण यात अत्यंत तरबेज झालेले आहेत. जीवावर उदार होत रथाला उटी लावण्याचे अत्यंत मेहनतीचे काम ते मोठ्या आनंदाने करत असतात.

अपुऱ्या एसटी बसेसमुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला.कर्जत पोलिसांसह विशेष पोलीस पथक, होमगार्ड यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी कुस्त्यांचा हगामा होणार असून राज्याच्या विविध भागातील मल्लांच्या निकाली कुस्त्या होणार आहेत.

बाजारपेठ फुलली.. बालगोपाळ रमले मनोरंजननगरीत

यात्रेमध्ये विविध मालांच्या विक्रीची शेकडो दुकाने सजली आहेत. त्यामुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मनोरंजननगरीत यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाळणे, मनोरंजनाचे खेळ, मौत का कुआँ, सर्कस आदी आल्याने बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. रथोत्सवानिमित्त थाटलेल्या बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)