दिव्यांग ‘पांडुरंग खडके’कडून मदनगड सर

इच्छाशक्तीच्या जोरावर घडविला इतिहास : घाटवर अादिवासी पाड्यावरील रहिवासी


-प्रा. डी. के. वैद्य

अकोले : दुर्दम्य इच्छाशक्ती असली, तर माणूस आकाशालाही गवसणी घालू शकतो, असे म्हटले जाते. अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य करण्याची किमया मूक व अपंग करू शकतात. ते केवळ असणाऱ्या जिद्धीमुळे. त्यामुळेच म्हटले जाते. मूक करोती वाचालम, पंगू लंघयते गिरीम्‌ हे वचन त्यामुळेच सर्वमान्य झाले आहे. त्याचाच प्रत्यय इगतपुरी तालुक्‍यातील (जि. नाशिक) अवघड अशा मदनगडावर अंपग असूनही अकोले तालुक्‍यातील घाटघर येथील पाडुरंग खडके या युवकाने दुसऱ्यांदा स्वारी करून इतिहास घडविला आहे.

पांडुरंग हा घाटघर या आदिवासी पाड्यावरचा. दुर्दैवाने त्याला पोलिओ झाल्याने एक पाय कायमस्वरूपी अधू झाला. मात्र आई बुधाबाई व वडील सीताराम यांनी हार मानली नाही. त्याला आई-वडील खांद्यावर घेऊन शाळेत नेऊ लागले. त्यामुळे पांडुरंगचे क्षितीज विस्तारले. शिक्षक, आई-वडील व मित्रांच्या साह्याने त्याने कुबड्या जवळ करून यशाच्या पायऱ्या चढू लागला. गतवर्षीच तो 10 वी उत्तीर्ण झाला.

शेजारी असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीत तो बागडत कुबड्यांच्या साह्याने छोटे-मोठे सुळके सर करू लागला. कळसूबाई, अलंग, मलंग व कुलंग यांचे त्याला सतत आकर्षण होते, राहिले. एकदा असेच मित्रांसोबत त्याने गडांमधील सर्वांत उंच ‘मदनगड’ गत वर्षी सर केला.

कळसूबाईपेक्षा किंचित कमी असणाऱ्या मदनगडाची उंची 4900 फूट आहे.हा गिरिदुर्ग इगतपुरी तालुक्‍यात असून, कळसूबाईच्या रांगेत मोडतो. यावरील दगडी गुहा, पाण्याच्या टाक्‍यांचे व नेढ्याचे पांडुरंगला आकर्षण राहिले. शिवाय 1760 साली परकीयांच्या ताब्यातील या किल्ल्यावर मराठ्यांनी भगवा फडकवला, याची त्याला माहिती होती. म्हणूनच त्याने गुरुदत्त क्रिकेट क्‍लबच्या 13 सदस्यांना विश्वासात घेतले व त्यांच्या 14 नोव्हेंबर 2018 रोजीच्या गड मोहिमेत तो सहभागी झाला.

सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वांत अवघड, चित्तथरारक परंतु मनाला भुरळ घालणाऱ्या व निसर्गाने रम्य मनोहर नटलेला अशा मदनगड मोहिमेत पांडुरंग काठ्यांच्या आधाराने गड सर सरण्यास सज्ज झाला. गप्पा मारता मारता ग्रुपमधील 13 जण मदनगडाच्या पायथ्याशी सकाळी 8 वाजता पोहचले. खिंडीमध्ये थोडी विश्रांती घेतली व पुढे निघाले. अंगावर काटे येणारा कडा व घनदाट जंगल गेल्यावर मदनगडाच्या पायऱ्या आल्यावर तिथेही सराईतपणे पांडुरंग पुढे होता.

इतका अवघड गड म्हणजे पायऱ्यावरून थोडा जरी तोल गेला, कपाळमोक्ष ठरलेला, असे दशरथ सोंगाळ यांनी सांगितले. परंतु पांडूरंग न घाबरता धाड धाड पायऱ्या चढला. पुढे गेल्यावर वर जाण्यासाठी वाटच नाही. नंतर एक एक जण धाडस करून कड्याला बोटे लावून हळूच वर गेला. तेथून हात किंवा पाय घसरला तर माराणालाच मिठी, असा उंच थरारक कडा.

वरती गेल्यावर त्याने दोरी बांधली. या दोरीच्या साह्याने चमू वरती गेला. पण मनाला भुरळ घालणाऱ्या नागमोडी पायऱ्या दोन्ही बाजूने उंच उंच कडे. शेवटी वर गेल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला . रात्रीचा अंधार होता. रातकिडे किरकिर करत होते. शेवटी पांडुरंग आपल्या गडावर पोहोचला होता. पांडुरंग गडावर पोचल्याचा आनंद त्याच्यासह त्याच्या मित्रांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.

इतिहास रचला गेलाय, त्याचे पांडुरंगला अप्रूप नाही. मात्र जिद्द असेल तर मुका बोलू लागतो व अपंग हा दुर्गम पर्वत चढू शकतो. यासाठी भविष्यात पांडुरंग याचा संदर्भ द्यावा लागेल. जागतिक विश्वविक्रमाची नोंदी ठेवणाऱ्या संस्थांनी त्याची नोंद करावी, अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)