अहमदपूर – एका मित्र मंडळाचे पदाधिकारी असलेले अहमदपूर येथील कार्यकर्ते सय्यद साजीद यांनी मराठा समाजाविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आज सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. साजीद याच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. आज सय्यद साजीद याच्या विरोधात अहमदपूर पोलिसांत 153 (अ) व आचारसंहिता कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी सय्यद साजीद याने कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मराठा समाजासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्या भाषणाची व्हिडीओ क्लीप लोकसभा मतदानाच्या दिवशी व्हायरल झाली. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज अहमदपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. समाजाच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या ठिकाणी तणाव निर्माण झाला.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी साजीद सय्यद याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी उपजिल्हाधिकारी व पोलिस यांच्याकडे करण्यात आली. या प्रकरणी अहमदपूरच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी पाटील-शेलार यांच्याशी संपर्क साधला असता अहमदपूर बंद असले तरी शांत आहे. कोठेही तणावाची परिस्थिती नाही, असे सांगून सय्यद साजीद याच्या विरोधात 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली.