अहिर चौथ्यांदा जिंकतील ?

चंद्रपूर लोकसभा
-विदुला देशपांडे 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने विशाल मुत्तेमवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर भाजपकडून सध्याचे खासदार हंसराज अहिर यांचे नाव जाहीर झाले आहे. 2004 पासून या मतदारसंघातून अहिर निवडून येत आहे. यावेळी चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामानाने कॉंग्रेसने अगोदर आपला उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. विशाल मुत्तेमवार यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. पण कॉंग्रेसमध्येच त्यांना कडाडून विरोध आहे. आपल्या पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मुत्तेमवार निवडणुकीला कसे सामोरे जातात हा प्रश्‍न आहे. इथे आम आदमी पक्षाकडून माजी आमदार आणि शेतकरी नेते वामनराव चटप हेही निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. विशाल मुत्तेमवार हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली तेव्हा कॉंग्रेसमधूनच त्यांना मोठा विरोध झाला. मुत्तेमवार यांना उमेदवारी म्हणजे भाजपला आयता विजय मिळवून देण्यासारखे आहे असा सूर कॉंग्रेसमध्ये आळवला जात होता. पण आता मुत्तेमवार यांनी हा विरोध पाहून आपण माघार घेत असल्याचे जाहीरही केले होते. शिवसेनेचे नेते बाळू धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला ते लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल म्हणून. पण आता त्यांची आमदारकीही गेली आणि लोकसभेची उमेदवारीही गेली. शिवसेनेत पक्ष नेतृत्वावरील नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण ही जागा भाजपची असल्याने शिवसेनेला इथे उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होते. पण आता धानोरकरांची चांगलीच पंचाईत झाली आहे. कॉंग्रेसने कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही मुत्तेमवार यांनाच उमेदवारी दिली गेली आहे.

या मतदारसंघातून तरुण उमेदवाराला संधी देणार असे पक्षाकडून सांगण्यात येत होते, त्याप्रमाणे नव्या चेहऱ्याला कॉंग्रेसने संधी दिली आहे आता ते निवडून येतात की नाही हा प्रश्‍न अलाहिदा. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे वामनराव चटप हेही आहेत. चटप हे शेतकरी नेते आहेत आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडूनही आले आहेत. शेतकरी नेते शरद जोशी यांच्याबरोबर काम केलेले आहे. शेतकरी वर्गात त्यांना आदराचे स्थान आहे. आम आदमी पक्ष या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देऊ शकतो. चटप हे वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ता आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांचे आव्हान मोठे असणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. 2009मध्ये बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश केलेले दत्ता हजारे हे भाजपचे नेते परत भाजपत आले आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे, मतदारांनीही आपल्या समस्या राजकीय पक्षांसमोर मांडायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत याची विचारणा करायला सुरुवात केली आहे.
भाजपने प्रचाराची जय्यत तयारी केली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पूर्वी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले नरेश कुमार पुगुलिया यांनी यावेळी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पुगुलिया गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे मानले जाणारे संजय देवताळे हेही खासदारकीची उमेदवारी घेण्यास उत्सुक होते. पण आता त्यांची संधी हुकली आहे. मुत्तेमवारांशी ते जुळवून घेतात की पक्षात राहून त्यांच्या विरोधात काम करतात निवडणूक जवळ येईल तसे स्पष्ट होईल.

चंद्रपूरमध्ये 17.15 लाख मतदार आहेत. अहिर यांना आपली जागा टिकवण्याचे आव्हान पेलायचे आहे तर मुत्तेमवार आणि चटप यांना जिंकण्याचे आव्हान पेलायचे आहे. सध्या तरी अहिर यांचे पारडे जड आहे. मुत्तेमवार यांना पक्षातील सगळ्या नाराज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर आणण्यात यश आले तर निवडणुकीत चित्र बदलूही शकते. तर चटप हेही क्रमांक तीनवरून दोनवर तरी येऊच शकतात. आम आदमी पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांची उमेदवारी मदत करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्याचा थेट परिणाम चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर होऊ शकतो. पंतप्रधानांच्या सभेचा अहिर यांना मोठा फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)