दुष्काळी सवलतीसाठी कृषी आयुक्‍तांना साकडे

आशुतोष काळे यांनी कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांना दिले निवेदन

कोपरगाव –
कोपरगाव तालुक्‍यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलतील दुष्काळग्रस्तांना तातडीने सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी कृषी आयुक्‍त तथा दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या चार मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करावा, यासाठी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी होवून या चारही मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. न्यायालयाने आदेश देवूनही अद्याप सवलती जाहीर न झाल्याने काळे यांनी थेट आयुक्‍तांना सवलतीबाबत साकडे घातले आहे.

तालुक्‍यात दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली. कोपरगाव तालुक्‍याच्या शेजारील तालुक्‍यामध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु कोपरगाव तालुक्‍याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यावेळी काळे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्‍यातील केवळ दहेगाव मंडलात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला. कोपरगाव तालुक्‍याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको, उपोषण आदी आंदोलन करून त्यांच्या भागातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी भाग पाडले. तालुक्‍यातील इतर चारही मंडलातील आणेवारी ही पन्नास पैशाच्या आत असून सर्वत्र दुष्काळाची भयावह परिस्थिती होती. त्यामुळे या भागातील शेतकरी सुनिल शिंदे, विठ्ठलराव आसने, केशवराव जावळे यांनी खंडपीठात दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तालुक्‍यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करावा असे आदेश प्रशासनाला दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार दुष्काळात होरपळत असलेल्या कोपरगाव तालुक्‍यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना व सर्वसमान्य जनतेला दुष्काळाच्या सवलती तात्काळ लागू करून दुष्काळाची दाहकता कमी व्हावी, यासाठी शेतकऱ्यांसमवेत कृषी आयुक्त दिवसे यांची भेट घेतली असल्याचे काळे यांनी संगितले आहे.  न्यायालयाचा आदेश मिळाले असून जिल्हाधिकारी यांच्याकडून दुष्काळ संबंधित माहितीचे दस्तावेज प्राप्त होताच मदत पुनर्वसन विभागाकडून तात्काळ मंजुरी घेऊन तालुक्‍यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव महसूल मंडलात दुष्काळ सवलती लागू करू असे आश्‍वासन दिवसे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)