मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर 

महापौर, आयुक्‍तांकडून युद्धपातळीवर उपाययोजना : अडीच महिन्यांनंतर ठेकेदाराकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण

नगर – गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांच्या विषयावरून वादळी चर्चा झाली असतांना मंगळवारी सायंकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुली जखमी झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला आज यावरून धारेवर धरल्याने महापौरासह आयुक्तांनी तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. 


दरम्यान, ज्या ठेकेदार संस्थेला कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला आहे. त्या संस्थेने तब्बल अडीच महिन्यानंतर दोन दिवसांपूर्वी आपले काम सुरू केल्याने महापालिकेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आयुक्
तांनी आदेश दिल्यानंतर कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू झाली आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून वाभाटे काढले होते. तरी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये कोणतीही सुधारण झाली नसल्याचे मंगळवारी झालेल्या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.

या सभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रकार घडले तर आरोग्याधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित नाही तर बडतर्फ केले जाईल असा इशारा दिला होता. परंतु मंगळवारी पुन्हा हल्ल्याचा प्रकार घडूनही महापौर अन्य कामांमध्ये व्यस्त होते. पत्रकारांनी त्यांना छेडले असता संबंधितांवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. कुत्रे पकडून त्याचे निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थेचे काम चालू असल्याचा दावा महापौरांनी केला. परंतु प्रत्यक्षात या संस्थेने दोन दिवसापूर्वी हे काम सुरू केले आहे. या संस्थेचे पैसे महापालिकेकडून देण्यास टाळाटाळ होत आहे.

गेल्या वर्षाभरात या संस्थेने 4 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करून 72 लाख रुपये बिलाची मागणी केली आहे. या बदल्यात महापालिकेने ठेकेदाराला केवळ 10 लाख रुपये दिले आहे. उर्वरित पैसे न दिल्याने या संस्थेने अडीच महिन्यांपासून कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम थांबविले होते. परंतु महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महापालिकेने या संस्थेला आणखी 10 लाख रुपये देण्याचे मान्य करून दोन दिवसापूर्वी त्या संस्थेचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या सावळ्या गोंधळामुळे मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापौरांनी संबंधित संस्था व आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलविली होती.

दरम्यान, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ठेकेदार संस्थेने म्हणावे असे काम केले नाही. त्याच्याकडे आवश्यक ती यंत्रणा देखील नाही. त्यामुळे आता पिंपळगाव माळवी येथे असलेल्या महापालिकेच्या जागेत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी सुमारे 200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण एकाच वेळी होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत या जागेचा वापर त्यासाठी केला जाईल. या ठेकेदार संस्थेकडे कुत्रे पकडल्यानंतर आलेले ठिकाण पाहिल्यानंतर तेथे केवळ चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण होवू शकते. परंतु आता पिंपळगाव माळवी येथे मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरण होवू शकते.

वाढत्या कुत्र्यांमागे कचरा ही समस्या :
शहरात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याला रस्त्यावर व कचरा कुंडीत टाकण्यात येणारा कचरा ही समस्या आहे. कुत्र्यांना खाण्यासाठी काहीच मिळाले नाही तर ते दुसरीकडे स्थलांतरित होतील. परंतु त्यांना मुबलक खाण्यासाठी उपलब्ध होत असल्याने ही संख्या वाढ आहे. त्यामुळे आता येत्या महिन्याभरात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनकडून 28 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून आवश्यक ती वाहने, घंटागाड्यांची खरेदी केली जाणार असून कचरा संकलनासाठी ठेका दिला जाणार आहे. शहरातील सर्व ओला व सुका कचरा जमा करण्याचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू केली असून निविदा काढण्यात आली आहे. तसेच वाहन खरेदीसाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे भालसिंग यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)