राष्ट्रीय कर्तव्यानंतर तिला संतानप्राप्तीचा आनंद

मतदान केल्यावर गोडोलीत प्राची घाडगे यांनी दिला कन्येला जन्म

सातारा – तिच्या प्रसव वेदनांची घटिका जवळ येऊन पोहचली असतानाही त्याच अवस्थेत गोडोलीच्या प्राची घाडगे यांनी आपल्या मतदानाचे कर्तव्य डॉक्‍टरांच्या परवानगीने पार पाडले. सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी ही माता प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले.

कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि मातृसुखाचा आनंद असा दुहेरी योग प्राची घाडगे यांनी साधला. प्राची घाडगे यांच्या पतीचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले तेव्हा त्या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. दुःखाचा डोंगर पचवून त्या प्रसव कालावधीसाठी तयार झाल्या. मंगळवारी मतदानाच्या दिवशी प्राची यांचे नऊ महिने नऊ दिवस भरले होते. प्रसुती केव्हाही होण्याची शक्‍यता होती. असे असतानाही प्राचीताई डॉक्‍टरांच्या परवानगीने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने गोडोलीत 23 नंबर शाळेत आल्या व त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुन्हा माघारी गेल्यावर सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांनी मुलीला जन्म दिला. बाळ व बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अवघडलेल्या अवस्थेतही आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या या मातेचे सातारा शहर परिसरात कौतुक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here