मोदीनंतर आता पवारांची साताऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्स

सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा जिल्ह्यातील भाजपच्या बुथप्रमुख, सदस्य व पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील राष्ट्रवादीच्या बुथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार आहेत. गुरूवार दि.7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांशी ते संवाद साधणार आहेत.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून खा.उदयनराजे यांच्या उमेदवारीला विशेषत: आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचा जाहीर विरोध आहे. तर नुकतेच खा.उदयनराजे समर्थकांनी बैठक घेत भाजपात जाण्याचा पर्याय सुचविला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व आ.शशिकांत शिंदे पर्यायी तगडे उमेदवार आहेत. भाजपकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात केली असून किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचा देखील येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पवारांनी साताऱ्यात प्रत्यक्षात न येता गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारेच संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नुकतेच पवारांनी माढा लोकसभेसाठी फलटण येथे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा राष्ट्रवादींतर्गत धुसफुसीचा सामना त्यांना करावा लागला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर गुरूवारी होणाऱ्या संवादाकडे आता जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)