आश्‍वासनपूर्तीनंतरच मोदींनी आंध्रात पाऊल ठेवावे- चंद्राबाबू

अमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन.चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील शाब्दिक हल्ल्याचे सत्र कायम ठेवले आहे. सर्व आश्‍वासनांची पूर्तता केल्यानंतरच मोदींनी आंध्रात पाऊल ठेवावे, असे त्यांनी आता म्हटले आहे.

मोदी सरकार आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास तयार नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत टीडीपी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडला. त्यानंतर मोदींनी प्रथमच 10 फेब्रुवारीला आंध्रचा दौरा केला. त्यावेळी टीडीपीने राज्यभरात निदर्शने केली. आता मोदी पुन्हा 1 मार्चला त्या राज्याला भेट देणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, चंद्राबाबूंनी टीडीपी नेत्यांशी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. केंद्रातील पाच वर्षांच्या राजवटीदरम्यान विशेष राज्याचा दर्जा न देऊन भाजपने आंध्रचा विश्‍वासघात केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची ग्वाही दिली आहे. आमच्या पाठिशी असलेल्या राजकीय पक्षांना आम्ही राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वायएसआर कॉंग्रेस आणि तेलंगण राष्ट्र समितीवरही (टीआरएस) टीकास्त्र सोडले. आंध्रचे नुकसान हा भाजप, टीआरएस आणि वायएसआर कॉंग्रेसचा समान कार्यक्रम आहे. गुन्हेगारांशी आपला राजकीय लढा आहे, असे चंद्राबाबूंनी पुढे बोलताना म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)