पीछेहाटीनंतर राजदमधील असंतोष चव्हाट्यावर

आमदाराकडून लालूपुत्राच्या राजीनाम्याची मागणी

पाटणा- बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाआघाडीच्या पीछेहाटीनंतर लालूप्रसाद यादव यांच्या राजदमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. त्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार महेश्‍वरप्रसाद यादव यांनी थेट लालूपुत्र तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तेजस्वी यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महेश्‍वरप्रसाद यांनी केली आहे.

राजदला घराणेशाहीचा सर्वांधिक फटका बसला. आता विरोधी पक्षनेतेपदी एखाद्या ज्येष्ठ नेत्याची निवड केली जावी. तो नेता यादव समजातील नसावा. मी मांडलेली मागणी पूर्ण न झाल्यास राजदमध्ये फूट पडू शकते. त्याशिवाय, बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजदला मोठा पराभव स्वीकारावा लागू शकतो, असा इशारा महेश्‍वरप्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. बिहारमधील महाआघाडीत राजद, कॉंग्रेससह पाच पक्षांचा समावेश होता.

मात्र, त्या महाआघाडीला राज्यातील लोकसभेची केवळ एक जागा जिंकता आली. ती जागा कॉंग्रेसच्या खात्यात गेली. राजद आणि इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही. त्या पीछेहाटीनंतर महाआघाडीतील घटक पक्षांना हादरे बसू लागले आहेत. महाआघाडीचा घटक असणाऱ्या रालोसपच्या तिन्ही आमदारांनी रविवारी सत्तारूढ जेडीयूमध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)