आखिर तारे जमीन पर…!

महायुतीच्या धसक्‍याने सगळे एका माळेत : मनोमिलन किती ठरणार परिणामकारक?
सम्राट गायकवाड

सातारा – महायुतीने केलेल्या मोर्चेबांधणीपुढे राष्ट्रवादी नेत्यांचा इगो कमी होत आहे. मागील तीन वर्षांत एकमेकांपासून दुरावलेले खासदार आणि आमदार अखेर प्रदेशाध्यक्षांच्या साक्षीने एकत्र आले. मात्र, एकत्र येणे हे निवडणुकीपुरती अपरिहार्यता आहे. खा.उदयनराजेंना आमदारांच्या पाठबळावर निवडून यायचे आहे तर आमदारांसमोर देखील विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आव्हान निर्माण झाले आहे. ते आव्हान लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कमी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या पार्श्‍वभूमीवर खासदार आणि आमदारांना कितपत यश मिळते, हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

जनता हाच माझा पक्ष म्हणणारे खासदार उदयनराजे लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाच्या छताखाली अलगद येतात. यंदाच्या तिसऱ्या निवडणुकीत भाजपकडून लढविण्याचा आग्रह होत असताना देखील त्यांनी राष्ट्रवादीकडूनच लढणे पसंत केले आहे. त्यामागे मागील पाच वर्षातील केंद्र सरकारचा कारभारावरची त्यांची नाराजी वरकरणी कारण असले तरी अद्याप जिल्ह्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे असलेले केडर हे महत्वाचे कारण आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. सर्व आमदारांचे स्वत:चे अन पक्षाच्या एकत्रित कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. त्या तुलनेत खा.उदयनराजे यांनी दहा वर्षात सातारा वगळता इतर विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करणे टाळले. मात्र, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय सलोखा ठेवला. ही बाब राष्ट्रवादीला कायम खुपत राहिली.

म्हणूनच मागील लोकसभा निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या उमेदवारीला आमदारांचा विरोध कायम राहिला. या ही निवडणुकीत तोच सुर कायम होता. मात्र, पाच वर्षानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तयारी भाजपने करून ठेवली. पाटणमध्ये सेनेचे आमदार शंभुराज देसाई यांचा मुख्यमंत्र्यांशी स्नेह असल्या कारणाने त्या ठिकाण भाजपने हस्तक्षेप करणे टाळले. सातारा मतदारसंघात दिपक पवार, कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले, कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, कोरेगावातून महेश शिंदे, माण-खटावमध्ये माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर व अनिल देसाई, फलटण विधानसभा मतदारसंघात सह्याद्री कदम गटाचा उमेदवार आणि वाई मतदारसंघात नुकताच प्रवेश झालेले मदन भोसले असे तगडे आव्हान भाजपने तयार करून ठेवले.

सातारा जिल्ह्याच्या इतिहासात कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर एवढे मोठे आव्हान प्रथमच तयार झाले. त्यामुळे साहजिकच खासदार व आमदारांनी अपरिहार्यतेने का होईना परंतु एकत्र येण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु जेवढे आव्हान आमदारांसमोर आहे तेवढेच आणि तगडे आव्हान खा.उदयनराजे यांच्यासमोर देखील निर्माण झाले आहे. 2009 आणि 2014 च्या निवडणूकीत केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. त्याचबरोबर दोन्ही निवडणूकीत खा.उदयनराजे यांच्यासमोर तगडा उमेदवार ही नव्हता. दोन्ही निवडणूकीत पुरूषोत्तम जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

यंदाच्या निवडणूकीत केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्या कारणाने साहजिकच पुरूषोत्तम जाधव यांना संधी मिळण्याची शक्‍यता अधिक होती. त्यासाठी त्यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. परंतु हाती आलेल्या सर्व्हेनुसार जाधवांपेक्षा तगडा उमेदवार देण्याचा निर्णय युतीच्या नेत्यांनी घेतला. त्यासाठी ऐनवेळी नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश ही करून घेतला. आता पाटील यांच्यासोबत सत्ता आणि सहा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची साथ असणार आहे. परिणामी यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की आहे. पार्श्‍वभूमीवर मनाने दुरावलेले राष्ट्रवादीचे नेते शरीराने एकत्र येताना दिसून येत आहेत. हे एकत्र येणे किती परिणामकारक ठरते हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

आ. शिंदेंसमोर दुहेरी आव्हान

राष्ट्रवादीकडून सुरुवातीचे दहा वर्षे जावली आणि नंतरचे दहा वर्षे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत असलेले आ. शशिकांत शिंदे यांच्यासमोर दुहेरी आव्हान असणार आहे. एका बाजूला कोरेगाव मतदारसंघातून त्यांच्यापुढे भाजपचे महेश शिंदे यांचे आव्हान तयार होत आहे. तर दुसऱ्या बाजूला माथाडी युनियनमधील सहकारी नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे आणि पाटील यांच्यात शीत युध्दास सुरूवात झाली आहे. मात्र, युध्दाची अखेर कशी होते ह्यावर आ. शिंदे यांची पुढची वाटचाल ठरणार आहे.

टोल नाका, मिसळ अन्‌ अभिनंदन

दरम्यान, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सातत्याने टोल नाका आणि मिसळीचा उल्लेख करून कळ दाबली आहे. टोलनाक्‍यावरून खासदार अन्‌ आमदार समर्थकांमध्ये झालेला राडा आणि आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत खालेल्या मिसळीचा ते अप्रत्यक्ष उल्लेख करताना दिसून येत आहेत. त्यात भर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पडली. महायुतीची उमेदवारी आपल्या जाहीर झाल्यानंतर अनेक सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले अभिनंदन केले, असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. आता पाटील यांचे अभिनंदन करणारे नेते कोण? हा शोध कधी घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)