अखेर महापालिकेने “तिथे’ लावला फलक

दरड कोसळण्याची भीती ः दैनिक “प्रभात’च्या वृत्तानंतर प्रशासनाची उपाययोजना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी या मार्गावर उभारलेल्या बीआरटी मार्गालगतच्या डोंगराची दरड काही प्रमाणात कोसळली होती. याचे सविस्तर वृत्त दै. प्रभातमध्ये 11 एप्रिलला प्रसिद्ध होताच, दुसऱ्याच दिवशी पालिकेने कोसळलेल्या दरडीचा राडा-रोडा तिथून हटवला आहे. आता महापालिका प्रशासनाने तिथे फलक लावून धोक्‍याचा इशारा दिला आहे, तसेच पदपथावरुन चालण्यास मनाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी रस्त्यालगत अनेक सोसायट्या नव्याने झाल्याने शहरीकरणाने मोठा वेग घेतला आहे. याशिवाय 100 कोटींपेक्षा अधिक निधीतून चऱ्होली परिसरातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. बीआरटी मार्ग विकसित करताना रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पादचाऱ्यांसाठी प्रशस्त पदपथ देखील ठेवण्यात
आले आहेत.

दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण करत असताना, वडमुखवाडी येथील संकल्प गार्डन मंगल कार्यालय व गोखले मळ्यासमोरील डोंगर फोडावा लागला. त्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. काही प्रमाणात ही दरड पदपथावर कोसळली होती. त्यानंतर याबाबत दै. “प्रभात’ मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच, महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, याठिकाणी कोसळलेली दरड हटविली. तसेच याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून, त्यापासून दूर राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)