उन्हाळ्यात वकिलांना कोट न वापरण्याची मुभा

कोटशिवाय फील येत नसल्याची कायदे तज्ज्ञांची भावना : मात्र पुण्यातील वकील वापरतात कोट

पुणे – काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेतो. त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्‍यतो टाळले जाते. मात्र, न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील याला अपवाद आहेत. व्यवसायाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटमध्येच वावरावे लागते. मात्र, कडक उन्हामध्ये काळा कोट परिधान केल्यामुळे वकिलांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना मार्च ते जून या कालावधीत काळा कोट न वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

काळा कोट ही वकिलांची ओळख आहे. न्यायालयाच्या आवारात कोट परिधान करणे बंधनकारक असते. न्यायदान करणारे न्यायाधीश बाजू मांडण्यासाठी येणारे वकील ड्रेसकोट घातला आहे किंवा नाही, याची दखल घेत असतात. ड्रेसकोड न घातल्याने न्यायाधीशांनी वकिलांना सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे न्यायालयात हजर होताना प्रत्येक वकील ड्रेसकोडबाबत अतिशय दक्ष असतात. मात्र, उन्हाळ्यात युक्‍तिवाद करताना वकिलांना उष्णतेच्या विकारांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामध्ये विशेषत: त्वचा विकार जास्त असतात. त्यातच सर्वोच्च, उच्च न्यायालय वगळता इतर न्यायालयांमध्ये एसीची सुविधा उपलब्ध नाही.

ग्रामीण भागात तर वीजेचे भारनियमन असते. त्यामुळे तेथे कुलर, पंखे वापरणेही अवघड बनते. त्यामुळे ज्या भागात तापमान सर्वाधिक असते. त्या भागात वकिलांना कोट वापरणे असह्य बनते. त्यामुळे उन्हाळ्यात कोट न वापरण्यास तिथे मुभा देण्यात आली आहे. थेट सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. तरीही तापमान कमी असलेल्या ठिकाणी वकील कोट वापरत असतात. पुण्यातीलही वकील सरासपणे कोट वापरत असतात.

वर्षानुवर्षे कोट घालण्याची सवय असते. कोट घातल्यावर परिपूर्ण वकील वाटतो. न्यायालयासमोर प्रेझेंटेशन करताना चांगले वाटते. कोट नसल्यास चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. त्यामुळे येथील वकील कोट घालण्यास प्राधान्य देतात. विशेषत: तापमान जास्त असलेल्या, वीज पुरवठा खंडीत होणाऱ्या आणि सोयी, सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो.

– सचिनकुमार गेलडा, खजिनदार, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

वर्षभर सकाळी 11 वाजता कोट घालून न्यायालयात जाण्याची सवय असते. कोट घातल्यावर न्यायालयात काम करताना एक मानसिकता तयार होते. ती कोट नसताना होत नाही. “कोट’बाबत मनात आदर असतो. केवळ बॅण्ड घालून काम करताना बर वाटत नाही. त्यामुळे बहुतांश वकील कोट वापरतात. कोट घालायचा की नाही, हा ज्याचा-त्याच्या आवडीनुसार ठरते.

– रोहित माळी, माजी कार्यकारिणी सदस्य, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)