28 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार

प्रतिक्षा संपली; शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा
 
पुुणे  – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी आता जलद गतीने प्रक्रिया सुरू आहे. राज्यात 11 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात काढण्यासाठी शिक्षण विभागाची धावाधाव सुरू झालेली आहे. राज्यात सन 2012 पासून शिक्षक भरती बंद होती. गेल्या वर्षी भरतीवरील निर्बंध उठविण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. पारदर्शकपणे भरती व्हावी यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यावर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 16 टक्‍के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्‍के आरक्षण शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्वच संस्थांना 3 वेळा बिंदूनामावली तयार करून ती तपासून घ्यावी लागली. बहुसंख्य जिल्ह्यातील संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून जाहिरात तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी सुरुवातीपासून शिक्षक भरतीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामकाज पद्धत राबविण्याला प्राधान्य दिले आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्याकडून शिक्षण आयुक्‍तांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेले आहे. किती संस्थांच्या िंबंदूनामावलींची तपासणी पूर्ण झाली, आरक्षण प्रवर्गानुसार किती पदे रिक्‍त आहेत याबाबतचा सखोल आढावा घेण्यात आलेला आहे.

आता संस्थांनी अंतिम तपासणी झालेली बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. संस्थांनी आपापल्या जाहिराती तयार करून त्याही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयांच्या स्तरावर शिकबरांचे आयोजनही बहुसंख्य ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी न झाल्यास व शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक, संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव जबाबदार राहणार आहेत, असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

“एसईबीसी’ वर्गाला राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी भरतीसाठी काहीच जागा शिल्लक नसल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहेत. यामुळे काही उमेदवारांकडून संताप व्यक्‍त करण्यात आला असून आम्हाला भरतीसाठी संधी द्या, अन्यथा भरतीच रद्द करा या मागणीसाठी आंदोलनही केली होती. शिक्षण आयुक्‍तांनी याबाबत शासनाकडून निर्देश मागविले होते. हे निर्देश शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले असून “एसईबीसी’लाही भरतीत पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचेही समजले आहे. प्रत्यक्षात भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतात याकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

भरतीसाठी आरक्षणनिहाय संधी
शिक्षक भरतीसाठी 2 दिवसांत पवित्र पोर्टलवर बिंदूनामावली व जाहिराती अपलोड करण्याची कामे संस्थांकडून पूर्ण होतील. 10 हजारांच्या पुढे जेवढ्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध होतील त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे. उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात करण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील. भरतीसाठी आरक्षणनिहाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)