अवमानकारक वागणुकीने आडवाणी दुखावले

निकटवर्तीयांनी दिली माहिती; तिकीट कापल्याची फारशी फिकीर नाही 

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हे त्यांना पक्षातून दिल्या गेलेल्या अवमानकारक वागणुकीमुळे कमालीचे दुखावले गेल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनीच ही माहिती दिल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यांना तिकीट नाकारल्याचे फारसे सोयर सुतक नाही पण त्यांना ज्या पद्धतीने पक्षाने वागणूक दिली त्याबद्दल ते दुखावले गेले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

भाजपने पक्षाच्या 75 वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वताहून आपली निवृत्ती जाहीर करावी अशी सुचना केली होती. त्यानुसार भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनी आडवाणी यांना फोन करून त्यांना पक्षाचा हा निरोप कळवला पण आडवाणी यांनी तसे करण्यास नकार दिला. कारण पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याने आपल्याला ही माहिती द्यायला हवी होती असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने केलेली सुचना पक्षाचे 75 वर्ष पुर्ण केलेले कालराज मिश्र, शांताकुमार, हुकुमदेव यादव, भगतसिंह कोशियारी, बी सी खंडुरी, कारीया मुंडा यांनी मान्य केली आणि त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केली. पण आडवाणी यांना एका सामान्य पदाधिकाऱ्याकडून फोन करून त्यांना राजकीय निवृत्तीची घोषणा करण्यास पक्षाकडून सांगण्यात आल्याने ते कमालीचे दुखावले गेले आहेत. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनाही पक्षाने अद्याप उमेदवारी दिलेली नाही. त्यांनीही वयाची पंचाहत्तरी पुर्ण केलेली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे त्याही नाराज असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)