आदर्कीत होल्टेजअभावी पाण्याचा ठणठणाट

पाणीपुरवठा योजना विस्कळीत; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
फलटण –
जिल्ह्यात सध्या दुष्काळी भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. मात्र, फलटण तालुक्‍यातील आदर्की ब्रुद्रुक येथे सार्वजनिक विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी आहे. मात्र, विजेचा पुरेसा दाब नसल्यामुळे दररोज पाणीपुरवठा योजना विस्कळीत होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीनेही त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केल्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

येत्या आठ दिवसांत जर वीज कंपनीने वीज पुरवठा पुरेशा दाबाने सुरळीत न केल्यास वीज कंपनी कार्यालय फलटण येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच बाळासाहेब कासार व ग्रामस्थांनी दिला आहे. आदर्की बुद्रुक ता. फलटण येथे गत तीन वर्षापूर्वी गावचा दूरदृष्टीचा विचार करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे 25 लाख खर्चून सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी तलावानजिक विहीर खोदली. त्यानंतर ग्रामपंचायतीने वीजकंपनीकडे नियम अटीनुसार विद्युत पुरवठ्याची मागणी केली. त्यावर वीजकंपनीने वीजदाबासाठी आवश्‍यक ते कागदपत्रे व फी घेवून विद्युत पुरवठासाठी वीज कनेक्‍शनही दिले. मात्र, पुरेशा दाबाने वीज पुरवठा गत तीन वर्षापासून अद्यापही कार्यान्वीत झालेला नाही. याबाबत लेखी व तोंडी सांगूनही वीज कंपनीने त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केले आहे.

याबाबत माहिती घेतली असता वीज कंपनीने सांगितले की, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर परिसरात शेतीपंपाची अनेक वीज कनेक्‍शन आहेत. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठासाठी स्वतंत्र डीपी कार्यान्वीत करावा लागणार आहे.
स्वतंत्र आठ दहा विजेचे पोल उभे करून वीज पुरवठा करावा लागेल. त्यावेळीच पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर ग्रामपंचायतने याबाबतच्या पुर्ततेसाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, तरीही त्याकडे वीज कंपनीने दुर्लक्षच केल्याने आता ऐन उन्हाळ्यात विहिरीला पाणी असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

दिवसेंदिवस उन्हाळा तीव्र होत चालला आहे. त्यामुळे अनेकांचा विविध ठिकाणाहून पाणी आणण्यातच अधिक वेळ जात आहे. त्यातच ग्रामपंचायतीचा मार्च एंड यामुळे करवसुलीनिमित्त आलेल्या ग्रामपंचायतच्या प्रशासनालाही याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे अगोदर पुरेशा प्रमाणात पाणी द्या मग करवसुलीचे बोला, असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.

तर पाण्याच्या टॅंकरचे बिल वीज कंपनीने द्यावे
ऐन उन्हाळ्यात गावच्या विहिरीला पाणी असूनही पुरेशा प्रमाणात वीज दाब नसल्याने पाणीपुरवठा योजना विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा कार्यान्वीत न झाल्यास गावांमध्ये प्रशासनाने पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. आता पाण्यासाठी टॅंकर सुरु झाल्यास दरम्यानच्या काळातील त्याचे बिल हे वीज कंपनीकडून वसूल करण्यात यावे, असे माजी सरपंच बाळासाहेब कासार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)