आढळराव पाटील विधानसभा लढणार ?

चर्चेमुळे आंबेगाव-शिरूर विधानसभेत राजकीय वातावरण गरम, आढळराव पाटलांकडून अधिकृत दुजोरा नाही


-संतोष वळसे पाटील

मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील उभे राहणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना झाल्यास या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष्य लागणार आहे. आगामी विधानसभेसाठी पाच ते सहा महिने शिल्लक असल्याने या निवडणुकीची पूर्वतयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर आढळराव आमदारकीसाठी उभे राहिल्यास या विधानसभा मतदारसंघात तब्बल 30 वर्षांनंतर राजकीय घमासान पाहायला मिळण्याची शक्‍यता राजकीय विश्‍लेषकांकडून वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीला आढळराव पाटील उभे राहणार किंवा नाही याबाबत त्यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना मागील वेळेस 18 हजारांचे मताधिक्‍य खासदारकीच्या निवडणुकीत मिळाले होते. त्यानंतर विधानसभेला दिलीप वळसे पाटील यांना 60 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत थेट गावापर्यंत जाऊन प्रचार यंत्रणा सक्षम पद्धतीने राबवली. वळसे पाटील व आढळराव पाटील यांचे मैत्रीचे राजकारण चालते असा आरोप वारंवार होतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाला मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी वळसे पाटील यांनी कंबर कसली. मागील खासदारकीच्या निवडणुकीत मोदी लाट होती. त्यावेळी आंबेगाव विधानसभा

मतदारसंघातून केवळ 18 हजार मतांचे लीड आढळराव पाटील यांना मिळाले होते. तर इतर विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्‍य मिळाले होते. स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन डॉ. कोल्हे यांना सुमारे 25 हजारांचे मताधिक्‍य आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिले. त्यामुळे पराभूत झालेले शिवाजीराव आढळराव पाटील बहुधा विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करीत असून अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षसंघटना बांधणी करून ते निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्‍यता मतदारसंघात रंगली आहे.

फारशी काळजी करीत नाही – वळसे पाटील

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे सलग सहावेळा विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यांचे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मताधिक्‍य चढत्या मतांनी राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सर्व त्यांच्या ताब्यात आहे. पक्ष संघटना मजबूत असल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. नेहमीच मतदारांच्या संपर्कात असल्याने त्यांना निवडणुकीत फारशी ताकद लावावी लागत नाही; परंतु धोका नको म्हणून ते नेहमीच मतदारसंघात सक्रिय असतात. येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेचा कोणीही नेता असो. त्याची मी फारशी काळजी करत नाही. मतदार आणि माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. ही माझी जमेची बाजू असल्याचे वळसे पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना मिळालेले मताधिक्‍य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरलेले आहे, तर शिवसैनिकांच्या पदरी निराशा आणणारे ठरले आहे.

 शिवसैनिकांचे मनोमिलन होणे गरजेचे

आढळराव पाटील हे धुरंदर राजकारणी असून मायक्रोप्लॅनिंग करून विधानसभा निवडणुकीत रंगत आणतील. असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. शिवसेनेत असणारे गट-तट यांना मूठमाती देऊन सर्व शिवसैनिकांचे मनोमिलन होणेही गरजेचे आहे. अनेक गावांनी शिवसेनेच्या शाखा नाहीत. तर शिरूर तालुक्‍यातील 39 गावांत शिवसेनेची अवस्था दयनीय झाली आहे, असे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरून स्पष्ट झाले आहे. आढळराव पाटील पराभूत झाले असले तरी पराभवाचा डाग पुसल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असून ते पराभवाचा वचपा काढण्यासाठी सक्रिय होतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आढळराव पाटील त्यावेळेच्या परिस्थितीचा अभ्यास करुनच राजकीय रणनीती आखतील, अशी चर्चा मतदारसंघात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)