शेतकऱ्यांना दिवसाही होणार पुरेसा वीजपुरवठा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी उद्‌घाटन 

7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ 


विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सचेही होणार उद्‌घाटन

मुंबई – साडेसात लाख शेतकऱ्यांना दिवसभर पुरेसा वीज पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे उद्‌घाटन येत्या 16 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना सरकारकडून दसऱ्याची भेट मानली जात आहे. सौर कृषी वाहिनीसह शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा देणारी एचव्हीडीएस योजना तसेच वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशनचे उद्‌घाटनही यावेळी करण्यात येणार आहे.

-Ads-

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री मदन येरावार तसेच मुख्य सचिव डी. के. जैन आदी उपस्थित राहणार आहेत. सध्या महावितरणकडून शेतक-यांना दिवसा आठ ते दहा तास अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. परंतु, शेतक-यांना दिवसाच्यावेळी अधिक वीज मिळावी म्हणून ऊर्जा विभागाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. यातून सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतक-यांच्या शेतीला वीज पुरवठा होईल. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 7 लाख 50 हजार शेतक-यांना दिवसा पुरेशी वीज मिळेल.

शेतक-यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली अर्थात एचव्हीडीसी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषीपंपासाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध असेल. त्यामुळे शेतक-यांमध्ये रोहित्राबद्दल स्वामित्वाची भावना निर्माण होऊन रोहित्र नादुरूस्तीचे प्रमाण घटेल तसेच वीज अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 2 लाख 24 हजार शेतक-यांना होणार असल्याचा महावितरणाचा दावा आहे.

केंद्र सरकारने इंधनाला पर्याय म्हणून वीजेवर धावणा-या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. राज्य सरकारने अलिकडेच काही इलेक्‍ट्रिकल वाहने घेतली आहेत. अशा वाहनांसाठी महवितरणने राज्यात 500 विद्युत चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 50 विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचेही उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)