अतिरिक्त आयुक्त उगले यांची अखेर बदली ; रूबल अग्रवाल नवीन अतिरिक्‍त आयुक्त

पुणे: महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची बदली करण्यात अखेर सत्ताधारी भाजपला यश आले आहे. उगले यांच्या बदलीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून सह्यांची मोहीम राबवित त्यांची बदली तातडीनं करावी, अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

अखेर पदाधिकाऱ्यांचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी बदली करण्यात आलेल्या गेल्या दिड वर्षातील उगले या दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त ठरल्या आहेत. उगले यांच्या पूर्वी शासनाकडून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातर यांची बदली करण्यात आली होती. तर उगले यांची बदली नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली असून शिर्डी संस्थाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल नवीन अतिरिक्त आयुक्त असणार आहे.

शितल उगले यांची बदली नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या विकासासाठी 1936 साली हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या शिवाय, उगले यांच्याकड सदस्य सचिव े वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. महापालिका आयुक्तांची मान्यता घेऊन या दोन्ही पदांचा तातडीनं पदभार घ्यावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) डॉ. सिताराम कुंटे यांनी महापालिकेस पाठविलेल्या पत्रात देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उगले या 11 मे 2017 रोजी महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्तपदी नियुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदां प्रक्रीयेतील गोंधळाला चाप लावला होता. त्यावरून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि उगले यांच्यात वादाचे खटके उडत होते. अनेकदा त्याचे पडसाद मुख्यसभेतही उमटले होते. उगले यांनी आपल्या 19 महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ तसेच पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी “बाला’ प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. तर, शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने महिला आणि बालकल्याण समिती मधील सदस्यांशी त्यांचे वादही झालेले होते. त्याचे पडसद अनेकदा महापालिकेच्या मुख्यसभेत उमटून नगरसेवकांनी थेट उगले यांना शासनाकडे पाठविण्याची मागणीही केली होती.त्या नंतर भाजपच्या सुमारे 80 हून नगरसेवकांनी त्यांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून बदलीची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

रूबल प्रखेर- अगरवाल नवीन अतिरिक्त आयुक्त

शितल उगले यांच्या रिक्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्थ व्यवस्था शिर्डी या पदाचा पदभार आहे. अगरवाल या 2008 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी असून रूबल यांनी या पूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मार्च 2017 मध्ये त्यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता त्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)