अभिनेत्यांची नेतेगिरी

सागर ननवरे

लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशभर घोंगावत आहे. अटीतटीच्या लढती हे या लोकसभेचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडे उमेदवार देऊन त्यांना नामोहरम करण्याची संधी प्रत्येक पक्ष शोधत आहे. मात्र, उमेदवार घोषित करताना अनेक पक्षांपुढे प्रश्नचिन्हही होते. ऐनवेळी बंडखोरी व पक्षांतर केल्यामुळे उमेदवार कोण असणार? ही देखील डोकेदुखी होती. परंतु माघार घेईल ते राजकारण कसले. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी व्यूहरचना केली. तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरेच मैदानात उतरविले. परिणामी अटीतटीच्या लढती होण्यासाठी आपोआपच मार्ग मोकळा झाला.

अभिनेते ते नेते हा प्रवास राजकारणात फार पूर्वीपासून पाहायला मिळतो. रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते जेव्हा राजकीय मंचावर येतात तेव्हा तो चर्चेचा विषय ठरत असतो. मोठमोठ्या कार्यक्रमांत एकत्र येणारे नेते आणि अभिनेते जेव्हा प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांविरोधात उभे राहतात तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात.
फार पूर्वीपासून अनेक अभिनेत्यांनी स्वतःला नेता म्हणून अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही राजकारणातही हिट ठरले आहेत. राजकारणात चांगला जम बसवून कार्यरत आहेत. मात्र, दुसरीकडे सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते राजकारणात मात्र ‘फ्लॉप’ठरले आहेत. त्यांना पुन्हा पडद्याकडेच वळावे लागले आहे.

1952 पासून खऱ्या अर्थाने नेता ते अभिनेता या संकल्पनेला सुरुवात झाली. कपूर घराण्याचे चित्रपटसृष्टीतील उगमस्थान जाणारे पृथ्वीराज कपूर यांनी याचा प्रारंभ केला. 1952 ते 1960 या काळात राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते.
त्यानंतर कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांचे चाहत्यांचा विचार करून नेत्यांना पक्षात घेण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा व्हावा आणि निवडणुकीत यशही मिळावे असा मानस नेतेमंडळींकडून ठेवला जाऊ लागला.
ऐंशीच्या दशकातील देशातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनीही राजकारणात प्रवेश केला. 1992 साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. पुढे काही काळांनंतर मात्र त्यांनी राजकारणाला पूर्णविराम दिला.

आज हिंदी चित्रपटसृष्टीत महानायक म्हणून दबदबा असणारे अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात पाऊल टाकले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश केला. 1984 ला अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवून तगड्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला; परंतु त्यांनतर 3 वर्षांतच त्यांचे नाव तत्कालीन बोफोर्स प्रकरणात आले. या धक्‍क्‍यातून अमिताभ यांनी राजकारणातून काढता पाय घेत आपला मोर्चा पुन्हा मनोरंजन विश्वाकडे वळविला. त्यांच्या पत्नी जया यांना मात्र राजकारणात चांगले यश मिळाले. समाजवादी पार्टीच्या माध्यमातून राज्यसभेवर खासदार म्हणून आजतागायत सक्रिय राजकारणात त्या आहेत.

2004 साली धर्मेंद्र यांनीसुद्धा राजकारणात प्रवेश केला. मात्र फारकाळ त्यात त्यांना अडकून राहता आले नाही. त्यांच्या पत्नी मात्र भारतीय जनता पक्षाशी 1999 पासून जोडल्या गेल्या आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक ते सध्याच्या लोकसभा खासदार असा त्यांचा प्रवास आजही सुरू आहे. हिंदी सिनेसृष्टीतील शत्रुघ्न सिन्हा, किरण खेर, नगमा, राज बब्बर, मनोज तिवारी, जयाप्रदा, चिरंजीवी, रवी किशन, मुनमुन सेन, परेश रावल, राखी सावंत, जावेद जाफरी, बाबुल सुप्रियो इ. अनेक चेहरे राजकारणात आले. मात्र त्यातील मोजक्‍याच चेहऱ्याना त्यात यश मिळविता आले.

दाक्षिणात्य सिनेजगत आणि राजकारण यात कमालीचा उत्साहवर्धक सहभाग पाहावयास मिळाला. तेथील अनेक कलाकारांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढण्यावर अधिक भर दिला. सी. एन. अन्नादोराई यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम’ (डीएमके) पासून ते रजनीकांत याच्या स्वतंत्र पक्षापर्यंत अनेक दाखले देता येतील.महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रात कोणत्याही अभिनेत्याला फार मोठे यश मिळविता आले नाही. महाराष्ट्रातील जनतेने अभिनेत्यापेक्षा नेत्यांना अधिक जवळ केले आहे. 2004 साली मुंबईतून खासदार म्हणून निवडून येत गोविंदाने कलाकारांच्या राजकारणाप्रती असणाऱ्या आशा वाढविल्या होत्या. मात्र राजकारणात टिकून राहून अपेक्षित यश त्यांना मिळवता आले नाही.

मराठी सिनेसृष्टीतील निळू फुले, दादा कोंडके, राम नगरकर, रमेश देव, मच्छिन्द्र कांबळी या जुन्या ज्येष्ठ कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला होता. परंतु राजकारणात तग धरून ठेवण्याचे मात्र त्यांना सपशेल अपयश आले. अगदी गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास मराठीतील सुप्रसिद्ध दिगदर्शक महेश मांजरेकर यांनाही पराभव पत्करावा लागला होता. जय- पराजयासाठी तत्कालीन परिस्थिती आणि लोकांचा कल अतिशय महत्त्वाचा ठरत असतो.सध्या 2019 च्या लोकसभा इलेक्‍शन साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिनेते अमोल कोल्हे तर कॉंगेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. साहजिकच देशभरात सिनेजगतातील उमेदवारांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.2019 ची लोकसभा निवडणूक नेते बनू पाहणाऱ्या अभिनेत्यांसाठी कितपत फायद्याची ठरेल हे लवकरच समजेल. तूर्तास तरी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची हे शेवटी जनता जनार्दनावरच अवलंबून आहे. नेता म्हणून राजकीय व्यासपीठावर पाहायचे की अभिनेता म्हणून टीव्हीवर पाहायचे याचा निर्णय शेवटी जनतेचाच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)