कार्यकर्ते म्हणतात, “एसी’कार द्या!

उन्हाचा पारा 43 अंशावर पोहोचल्याने कार्यकर्ते धजावेनात प्रचारास उन्हामुळे जिवाची लाही लाही;  

जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हान
निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. युवा, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाला प्राधान्य दिले जात असले तरी आजही मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावरच उमेदवारांचा भर दिसून येत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी पाहता उमेदवारांसमोर जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हान असून, त्याकरिता धावता प्रचार केला जात आहे.

नगर  – एरव्ही नेत्यांची जोशपूर्ण भाषणे, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असल्याने निवडणुकीचा पारा चढत असल्याचा अनुभव येतो. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत असून, मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा 43 अंशावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जिवाची लाही लाही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून “एसी’ कारची मागणी केली जात आहे.

नियोजनात ऐनवेळेवर बदल

तापत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारांना त्यांच्या पूर्वनियोजनात ऐनवेळेवर बदल करावे लागत आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधताना अडचणी येत आहेत. रखरखत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांना मतदारही भेटत नसल्याची परिस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच येत्या 23 एप्रिल रोजी नगर लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. कालपासून खऱ्या अर्थाने जाहीर प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात दंड थोपटून असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी आता केवळ 13 दिवसांचा अवधी उरला आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, नगर दक्षिणेच्या कानाकोपऱ्यात पोहोचून मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे.

प्रचाराचा कालावधी लक्षात घेता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते काटेकोरपणे नियोजन करून घराबाहेर निघत आहेत. नियोजन करण्यामध्ये युती व आघाडीचे कार्यकर्ते अग्रेसर असल्याचे चित्र आहे. सकाळी 8 वाजता स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी निघत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवसापासूनच जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांपासून सूर्यनारायण आग ओकू लागले असून, पारा 43 अंशावर पोहोचला आहे. याचा परिणाम उमेदवारांनी आखलेले दौरे, कॉर्नर बैठकांवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)