लोकसभा मतमोजणी प्रक्रिया उमेदवारांकडून केली जाते प्रतिनिधींची नियुक्ती
पुणे – पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेत मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांकडून जे प्रतिनिधी नेमले जाणार आहेत त्यांना ज्या टेबलावर नियुक्त करण्यात आले आहे. त्याचठिकाणी त्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. हे प्रतिनिधी अन्यत्र निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. उमेदवाराने बनावट प्रतिनिधी नियुक्त केल्याचे आढळल्यास त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांकडून त्यांचे प्रतिनिधी नेमले जातात. यंदा या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येणार आहे. मतमोजणीच्या वेळी आपले प्रतिनिधी जास्त असावेत, यासाठी काही उमेदवार दुसऱ्या उमेदवारांकडून मतमोजणीचे पासेस घेतात. यामुळे मतमोजणीच्या टेबलावर एकाच उमेदवाराचे जादा प्रतिनिधी उपलब्ध होतात. या पार्श्वभूमीवर असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल प्रशासनाने उचले आहे.
मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना विधानसभा मतदारसंघ आणि टेबल क्रमांक नुसार नियुक्तीचे ओळखपत्र दिले जाणार आहे. टेबलच्या ठिकाणीच संबंधित प्रतिनिधींना प्रवेश आहे. अन्य ठिकाणी प्रतिनिधी गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच एखाद्या उमेदवाराने बनावट प्रतिनिधी नेमल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असून संबंधित खर्च उमेदवाराच्या खर्चात धरण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली. मतमोजणी दि.23 मे रोजी होणार असून पुणे, बारामतीसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात तर शिरूर आणि मावळसाठी मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे.