बेकायदा वृक्षतोड प्रकरणी रस्त्याच्या हद्द निश्‍चितीनंतर कारवाई

तहसीलदार समवेतच्या संयुक्त बैठकीत निर्णय

पाथर्डी – चिंचपूर इजदे येथे ठेकेदाराने केलेल्या बेकायदा वृक्षतोड प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची रुंदी मोजून हद्द निश्‍चित करावी. मोजणीनंतर ठेकेदारांनी तोडलेली झाडे बेकायदेशीर आढळल्यास या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करू. त्याचबरोबर ठेकेदाराने यापुढे बेकायदेशीरपणे वृक्षतोड करू नये अशी तंबी तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली. नवगण राजुरी (जि.बीड) ते चिंचपुर इजदे फाटा रस्ता रुंदीकरण करताना बेकायदेशीर वृक्षतोड करून ठेकेदार व वनाधिकाऱ्यांनी कायदा पायदळी तुडवला आहे. या प्रकरणातील दोषी ठेकेदाराशी हातमिळवणी करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी चिंचपूर इजदे ग्रामस्थांनी सोमवार (10 जून) रास्ता रोको आंदोलन केले होते.

या संदर्भात वनाधिकारी, ठेकेदारांचे प्रतिनिधी व ग्रामस्थात अशी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले. त्याप्रमाणे आज सकाळी अकरा वाजता तहसीलदारांच्या दालनात पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, वन अधिकारी शिरीष निरभवणे, ऐश्वर्या कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे जनरल मॅनेजर एकनाथ देशपांडे, चिंचपुर इजदे येथील शेतकरी आदिनाथ खेडकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, गोकूळ दौंड, बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब गर्जे यांच्यासह निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी वन अधिकारी शिरीष निर्भवणे यांनी ठेकेदाराने बेकायदा वृक्षतोड केल्याचे मान्य केले.

विनापरवाना वृक्षतोडीबाबत संबंधित कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत कृषी खात्याकडून झाडाची किंमत काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असल्याचे सांगितले. मात्र तक्रारदार शेतकरी आजिनाथ खेडकर यांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना वन विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. खेडकर म्हणाले, वन विभागाची परवानगी न घेताच शेकडो झाडांची कत्तल झाली. मात्र वनविभागाने कारवाई करण्याचे सोडून ठेकेदार कंपनीची वकिली सुरू केली आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे मला यामध्ये कुठलीही नुकसान भरपाई नको यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

तहसीलदार नामदेव पाटील यांनी सर्वांची भूमिका ऐकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याची रुंदी मोजून हद्द निश्‍चित करावी त्यानंतर तोडलेली झाडे नियमात होती किंवा नाही हे निश्‍चित होईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून मोजणी करण्याबाबत सूचना दिल्या.तसेच बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाली असेल तर कायदेशीर कारवाई करा, ठरवून दिलेल्या झाडांव्यतिरिक्त कुठलेही झाड बेकायदेशीरपणे तोडू नये अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)