सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महापालिकेला इशारा
पुणे – सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सूचना देऊनही महापालिकेने त्याबाबत उपाययोजना न केल्याने, मंडळाकडून महापालिकेचा तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी गोठविण्यात आला होता. हा निधी वापरण्याची परवानगी महापालिकेने मंडळाकडे मागितली होती. मात्र, आधी प्रक्रिया प्रकल्पाचा सविस्तर “ऍक्शन प्लॅन’ सादर करा, त्यानंतरच निधी वापरण्याची परवानगी देऊ, असा इशारा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच “एमपीसीबी’ने महापालिकेला दिला.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 25 एप्रिल 2019 रोजी बॅंकेला महापालिकेचा निधी गोठविण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्याचे प्रकार रोखण्याबाबत तातडीने कारवाई करणे बंधनकारक होते. त्यानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुने महापालिकेला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या, तसेच महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर लवकरात लवकर प्रक्रिया केली जावी आणि त्यासाठी प्रतिदिवस ठराविक निधी बाजूला काढून ठेवावा, असा आदेश दिला होता.
मात्र, महापालिकेने या आदेशाकडे दुर्लक्ष करत त्याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. इतकेच नव्हे, तर निधीदेखील बाजूला काढण्यात आला नव्हता. याविरोधात कठोर कारवाई करत अखेर “एमपीसीबी’कडून बॅंकेला महापालिकेचा ठराविक निधी गोठविण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत बॅंकेने हा निधी गोठविला. त्यानंतर महापालिकेने “एमपीसीबी’कडे निधी वापरण्याची परवानगी मागितली असता, आधी प्रक्रियेबाबत सविस्तर आराखडा सादर करा मगच परवानगी देऊ,अशी भूमिका मंडळाने घेतली आहे.