महापालिकेतर्फे वृक्षारोपण, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची उभारणी
पुणे – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण, घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची उभारणी या चतु:सुत्री कार्यक्रमाद्वारे हवाप्रदूषणाचा सामना करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून प्रकल्पपूर्तीनंतर शहरातील प्रदूषणावर मात करण्यात प्रशासन यशस्वी ठरेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवेचे वाढते प्रदूषण आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची दखल घेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वाधिक हवेचे प्रदूषण असणाऱ्या शहरांना प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत “अॅक्शन प्लॅन’ सादर करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये पुण्याचाही समावेश होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने हवा प्रदूषणाबबतचा “अॅक्शन प्लॅन’ मंडळाकडे सादर केला आहे. यामध्ये प्रदूषणाची सद्यस्थिती, प्रमुख कारणे आणि ती रोखण्याबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उभारण्यात येणारा मेट्रो प्रकल्प, बीआरटी प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी, सायकल वापरासाठी प्रोत्साहन, सीएनजी वापरावर भर असे विविध प्रयोग केले जात आहेत. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया प्रकल्प उभारणी आणि उघड्यावर कचरा जाळला जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी पर्यावरण पूरक पायाभूत सुविधांची उभारणी आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीमदेखील सुरू असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दीघे यांनी सांगितले.
दीघे म्हणाले, “महापालिकेकडून सध्या विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सध्या याचा फारसा परिणाम दिसून येत नसला तरी, आगामी काळात या प्रकल्पांमुळे शहराच्या पर्यावरणाला आणि येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र, यामध्ये नागरिकांचा सहभाग तितकाच आवश्यक ठरणार आहे. नागरिकांनी देखील पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.’
हवाप्रदूषणाची कारणे
वाहनांतून उत्सर्जित होणारे कार्बन
धूळ आणि धूलिकण
उघड्यावर कचरा जाळणे
वृक्षतोड
प्रमुख प्रदूषणकारी घटक
पीएम 2.5
पीएम 10
नायट्रोजन ऑक्साइड
सल्फर डायॉक्साइड
कार्बन डायॉक्साइड
तुम्ही काय करू शकता?
कमी अंतरावरील प्रवासासाठी पायी
अथवा सायकलचा वापर
महिन्यातून एकदा “नो व्हेईकल डे’ या सुत्राचा अवलंब
कचरा जाळू नये
सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन