प्रशासनाच्या तपासणीत आढळल्या त्रुटी ः तपासणी पूर्ण होईपर्यंत उत्पादन, विक्री बंद
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित मल्टिफ्लेक्समध्ये सामोस्यांचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करून उत्पादन व विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अस्वच्छता आणि प्राथमिक काळजीही न घेतल्याप्रकरणी पिंपरीतील खराळवाडी येथील एम. के. एंटरप्रायजेस या उत्पादकावर एफडीएने कारवाई केली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 च्या प्रमुख उद्देशानुसार मानवी सेवनास सुरक्षित, सकस अन्न पदार्थ उपलब्ध होणे असा आहे. त्या उद्देशाचे पालन होण्यासाठी व पालन करण्याची प्रमुख जबाबदारी उत्पादकाची आहे. अन्नपदार्थ तयार केले जातात तेथे स्वच्छतेची तपासणी नसणे, पत्र्याच्या शेडमध्ये अस्वच्छ जागेत सामोसे बनविणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेली नसणे, भिंतींना रंग नसणे, तीनपेक्षा अधिक वेळा तेल न तळणे व इतर प्राथमिक बाबींचीही काळजी न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वसाधारण पाहणी करताना ही कारवाई करण्यात आली.
तसेच दिवसाला दोन ते अडीच हजार सामोस्यांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएने दिली. तसेच जोपर्यंत पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केली जात नाही, तोपर्यंत त्यांना उत्पादन व विक्री करता येणार नाही, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादकाने विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थांची तपासणी स्वतःच्या मालकीच्या प्रयोगशाळेत अथवा शासनाच्या प्रमाणित करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत ही तपासणी करणे गरजेचे आहे. ती न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संजय नारागुडे, अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. सोनकांबळे यांनी ही कारवाई केली.