पुणे – महापालिकेच्या अस्वच्छ शाळांच्या मुख्याध्यापकावरच कारवाई करण्याचे संकेत स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात मुख्याध्यापकांवरही कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
महापालिकेत स्थायी समितीची बैठक मंगळवारी झाली. यावेळी पटसंख्या, अस्वच्छता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल आदींवर चर्चा झाली. या चर्चेत शळांमधील अस्वच्छतेमुळे विद्यार्थी व पालक खासगी शाळांना पसंती देत असल्याचे सदस्यांनी म्हटले.
महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या असलेली विद्यार्थ्यांची संख्या आहे तशीच रहावी, यासाठी कार्यवाही करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर चर्चा करण्यात आली. शाळेतील अस्वच्छतेला मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग जबाबदार असून स्वच्छतेकडे ते लक्ष देत नसल्याचे अनेक सदस्यांनी म्हटले. त्यामुळे शाळेचा परिसर, खोल्या आणि स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरच कारवाई करण्याची सूचना सभासदांनी केली.
शिक्षण विभागाचे अधिकारी शिवाजी दौंडकर म्हणाले, “महापालिकेच्या शाळांमध्ये 2 हजार स्वच्छतागृहे आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी 2 कोटी रुपये खर्च केले जातात.’ तर नगरसेवक दीपक पोटे यांनी स्वच्छतेचे वेळापत्रक तयार करून वेळोवेळी पाहणी करण्याचे सूचविले.