वाहनांवर डिजिटल ई चलनाने कारवाई

कराड – राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेदरकार वाहन चालकांवर यापुढे डिजिटल ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कराड महामार्ग पोलिसांच्या वतीने नुकतीच ई-चलनाद्वारे अशा कसूरदार वाहन धारकांवर कारवाईची मोहीम सुरू केली असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. अस्मिता पाटील यांनी दिली.

एक राज्य एक ई-चलन प्रकल्प प्रादेशिक विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व महामार्गावर सुरू करण्यात आला आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सध्या सर्व महामार्गावर सुरू झाली आहे. महामार्ग पोलीस कराड यांना एकूण 6 ई-चलन मशीन देण्यात आले आहेत. कराड महामार्ग पोलिसांकडे पेठनाका (जि.सांगली) ते शेंद्रे (जि.सातारा) या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच गुहागर ते जत राज्य मार्गावरील आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भाग कराड महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत आहे.

डिजिटल चलनामुळे जीईएन पावती पुस्तके वापरण्याची व केसेस संदर्भातील रेकॉर्ड ठेवण्याची आवश्‍यकता भासणार नाही. एक राज्य एक ई-चलन प्रकल्पामुळे सर्व केसेस व अपघातांची माहिती ऑनलाइन समजणार आहे. अपघात झाल्यास घटना स्थळाच्या परिस्थितीचा फोटो डिजिटल मशिनद्वारे कंट्रोलला पाठवता येणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा नंबर त्याच गाडीचा आहे का? संबंधीत वाहन चालकांचे लायसन्स निलंबित आहे का? वाहनांचा विमा काढला आहे की नाही? यापूर्वी वाहनांवर किती गुन्हे आहेत. संबंधित वाहनाने दंड भरला आहे की पेंडींग आहे? याबाबतची संपूर्ण माहिती कोठेही या मशिनद्वारे ऑनलाईन समजू शकणार आहे. कारवाई करीत असताना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने कारवाई करता येणार असल्याचे अस्मिता पाटील यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)