समितीचे संचालक विरोधक म्हणून काम करणार
वाठार – कराड पाटण शिक्षक सोसायटीतील सत्ताधारी परिवर्तन पॅनलमध्ये फूट पडली असून सहयोगी घटक असलेली शिक्षक समिती पॅनेलमधून बाहेर पडली आहे. इथून पुढे शिक्षक समितीचे संचालक सोसायटीमध्ये विरोधक म्हणून काम करतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष अरुण पाटील यांनी दिली.
कराड-पाटण शिक्षक सोसायटीमध्ये चार वर्षांपूर्वी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून शिक्षक संघ व शिक्षक समितीने युती करून सत्ता परिवर्तन केली होती. यामध्ये शिक्षक समितीचे चार संचालक होते. निवडणुकीवेळी शिक्षक समितीला चेअरमन पदाची एक वर्ष संधी देण्याचा ठराव झाला होता. परंतु गत चार वर्षांपासून या पदाची हुलकावणी देण्याचे काम परिवर्तन पॅनेल प्रमुखांनी केले असल्याचा आरोप करत शिक्षक समिती या पॅनेलमधून झालेल्या चेअरमन निवडीवेळी बाहेर पडली.
सोसायटीमध्ये चार संचालक असलेल्या शिक्षक समितीच्यावतीने अंकुश नांगरे यांनी चेअरमन पदासाठी निवडणूक लढवली. विशेष म्हणजे समितीचे चार संचालक असताना नांगरे यांना नऊ मते मिळाली. यावरून सोसायटीमध्ये चाललेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला असलेला विरोध संचालकांनी मतदानाद्वारे व्यक्त केला असल्याचे स्पष्ट होते.
यावेळी प्रामुख्याने तालुकाध्यक्ष अरुण पाटील, शिक्षक बॅंकेचे संचालक सुभाष शेवाळे, जल्हाउपाध्यक्ष संजय नांगरे, बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन मोहनराव सातपुते, संचालक अंकुश नांगरे, आनंदराव थोरात, अनिल कांबळे, सौ. सुनिता यादव, दिनकर पाटील, शशिकांत तोडकर, गोविंद वडकर, रवींद्र मोरे, साहेबराव कदम, सिकंदर मुल्ला, माणिकराव थोरात, लालासाहेब देसाई, प्रदीप निळकंठ, यशवंत जाधव, रामकृष्ण थोरात, मधुकर भंडारे, जगन्नाथ थोरात, संपतराव साकुर्डे, दत्तात्रय जाधव, प्रविणकुमार कारंडे, पाटणचे अध्यक्ष विनायक चव्हाण, संजय साठे, शंकर पाटील आदींसह बहुसंख्य समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार नारायण सातपुते यांनी मानले.