मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे बोलीभाषांचेही संमेलन होणे आवश्यक – राज्यपाल

मुंबई: मराठी ही लोकप्रिय भाषा आहे. ग्रामीण किंवा लहान समूहांद्वारे बोलली जाणारी भाषा विशेषतः बोलीभाषा धोक्यात आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्व बोलीभाषांचे वार्षिक संमेलन होणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर सी. विद्यासागर राव यांनी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी मराठी भाषामंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी,ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, रामदास भटकळ यांच्यासह पुरस्कार विजेते साहित्यिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यपाल यावेळी म्हणाले, महाराष्ट्रात सर्व मातृभाषा, बोलीभाषा आणि भाषांचे संरक्षण, संरक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी एक योजना सुरू करण्याची गरज आहे.यासाठी वृत्तपत्र/साप्ताहिके, वृत्तसमूह आणि वेब-आधारित समूहांद्वारे सर्व भाषांच्या प्रचारासाठी मदत घेता येऊ शकेल.

मराठी ही वैश्विक पातळीवर बोलली जाणारी भाषा

आजच्या तरुणांमध्ये फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि यांसारख्या परदेशी भाषा शिकण्याची जिज्ञासा दिसून येते याचे नक्कीच स्वागत आहे. परंतु आपल्या भारतीय भाषा संवर्धन करून त्यांच्या प्रचारासाठी तसेच संस्कृत आणि इतर भारतीय भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या लोकसंख्येच्या बरोबरीने आहे. बंगाली, तेलुगू, तमिळ आणि हिंदीसह मराठी हीदेखील वैश्विक पातळीवर बोलली जाणारी भाषा असून जगातील मुख्य भाषांच्या क्रमवारीत आहे.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसही साजरा करुया

ज्याप्रमाणे आपण 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करीत आहोत. त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या काळात 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करुया. आज जगभरात 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आणि भाषेचा जागतिक वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. मातृभाषा टिकविण्यासाठी, मातृभाषेचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहनही विद्यासागर राव यांनी केले.

आपल्या भाषेचे महत्त्व ओळखा

राज्यपाल म्हणाले, आपली भाषा नदीसारखी आहे. कारण भाषा संप्रेषण किंवा अभिव्यक्तीच्या माध्यमापेक्षा बरेच काही असते. भाषा माणसांना माणसासोबत जोडून ठेवते. भाषेमध्ये आपले मूल्य, आदर्श आणि आपली ओळख अंतर्भूत आहेत. आपल्या भाषेद्वारे आपण आपले अनुभव सामायिक करतो. मराठी ही देशातील सर्वात श्रीमंत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा हजारो वर्षांपासून विकसित आणि समृद्ध होत आहे आहे. मराठी भाषा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,चक्रधरस्वामी, संत एकनाथ, संत तुकाराम आणि इतर संत महात्म्यांनी, संत-कवी आणि सामाजिक सुधारकांनी भाषा समृद्ध केली आहे.

अलीकडच्या काळात इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या सर्व भाषांमध्ये आव्हाने येत आहेत. इंग्रजी ही रोजगाराची भाषा आहे. या भाषेचे एक जागतिक भाषा म्हणून स्वागत केलेच पाहिजे पण त्याचबरोबर तरुण पिढीने आपल्या मातृभाषेत लिहिणे आणि वाचणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये प्रकाशित केलेल्या एका अहवालात काही काळापूर्वी जगात जवळपास 7 हजार भाषा बोलल्या जात असल्याची नोंद होती. मात्र आता जवळपास निम्म्या भाषा विलुप्त होण्याचा धोका असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

पालकांनो मुलांशी मातृभाषेतच बोला…

बरीच मुले शाळेत, घरी त्यांच्या पालकांसोबत इंग्रजी भाषेत संभाषण करीत असतात. असे घडत असल्याने नवीन पिढी  आपल्या बोलीभाषा आणि मातृभाषेमध्ये बोलायला विसरली आहे. असेच चित्र राहिले तर, येत्या काही वर्षात मुले आपल्या मातृभाषेत वाचू किंवा लिहिण्यास सक्षम नसतील. लहान मुलांना आणि तरुणांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त करण्याची आणि मातृभाषेत लिहिण्याची प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे राज्यपाल यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

आजची तरुण पिढी ही वाचत आहे. येणाऱ्या काळात पुस्तके डिजिटल करणे आवश्यक आहे आणि त्या सर्वांसाठी ही पुस्तके वाचनीय बनविणे आवश्यक आहे. राज्य शासनाने सर्व राज्य ग्रंथालये डिजिटल करून एक सार्वजनिक मराठी डिजिटल ई-लायब्ररी स्थापन करणे आवश्यक आहे. मराठी डिजिटल लायब्ररी जगभरातील मराठी भाषिकांना मराठी साहित्याशी जोडण्यासाठी मदत करेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)