जनावरांसाठी खाद्य आणण्याकरिता निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

गिरवली येथे टेम्पोला ट्रकची धडक

जुन्नर – पाळीव जनावरांसाठी भुसा आणण्यासाठी पारनेर तालुक्‍यातून गिरवली (ता. आंबेगाव) येथे आलेल्या कुटुंबाच्या टेम्पोचा गुरुवारी (दि.11) सायंकाळी जुन्नर-घोडेगाव रस्त्यावर अपघात झाला. डोंगरवाडी (ता. पारनेर) या दुष्काळी भागातून आलेल्या शेतकरी डोंगरे कुटुंबीयांच्या तीन चाकी टेम्पोला एका भरधाव हायवा ट्रकने (क्र. एमएच 16 – एवाय 3040) सावरगाव जवळ धडक दिली. या अपघातात शेतकरी असलेले उत्तम सुखदेव डोंगरे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी अनिता व मुलगा अजित जखमी झाले आहेत. हायवा ट्रकचालक मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. बेल्हे) यास अटक करण्यात आली आहे.

डोंगरे कुटुंबीय आपल्या जनावरांना भुसा आणण्यासाठी स्वतःच्या तीन चाकी तीनचाकी टेम्पोतून गिरवली येथील पाहुण्यांकडे आले होते. टेम्पोमध्ये खाद्य भरून गावी परतताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकशी जोरदार धडक झाली. हा अपघात होण्याअगोदर या बेशिस्त हायवा चालकाने सावरगाव येथून भरधाव वेगाने पुढे जात असताना पुलाच्या कठड्यालाही धक्का मारल्याचे तसेच त्याने मद्यप्राशन केल्याचे त्याच्या चालण्या-बोलण्यावरून निदर्शित होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here