पिंपरी – कामावरुन पायी घरी निघालेल्या एका कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक क्र. 55 येथे घडली. चन्नाप्पा वैजनाथ बेल्लुरे (वय 55, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा बसवराज चन्नाप्पा बेल्लूरे (वय 31) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास चन्नाप्पा हे कंपनीतले काम आटपून पायी घरी निघाले होते. ते भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक क्र.55 येथे आले असता भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चन्नप्पा यांना रुग्णालयात न नेता वाहनचालकांने तेथून पळ काढला. त्यांनतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकऱणी बसवराज यांनी सोमवार (दि. 10 जून) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.