सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करा

आ. शिवेंद्रसिंहराजेंची मागणी; मुख्यमंत्र्याशी सकारात्मक चर्चा

सातारा – सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे अत्यावश्‍यक असल्याने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. हद्दवाढीबाबत मुख्यमत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन ना. फडणीवीस यांनी यावेळी दिले.

मुंबई येथे अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांना हद्दवाढीबाबत निवेदन देवून हद्दवाढ मंजूरीबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यंमत्र्यांच्या अखत्यारित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसंख्या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्‍यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मुलभूत सोयी, सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत असते. सातारा शहरालगत अनेक पर्यटनस्थळे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्‍यतारा किल्ला, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सातारा शहराची हद्दवाढ होणे अत्यावश्‍यक आहे. सातारा पालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर केलेला आहे.
शहरालगतच्या प्रस्तावित हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबध्दरित्या नागरी सोयीसुविधा व नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने सदरच्या हद्दवाढ प्रस्तावास तातडीने मान्यता मिळण्यासाठी आपण संबंधीत विभागाला सुचीत करुन हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हद्दवाढीच्या प्रस्तावात शासनाने दाखवलेल्या त्रुटींची पुर्तताही करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. यामुळे सातारा शहराच्या आणि आसपासच्या उपनगरांच्या, त्रिशंकू भागाच्या विकासावर दुरोगामी परिणाम होत आहे. याबाबत गांभिर्याने विचार केल्यास हद्दवाढ अत्यावश्‍यक असल्याचे दिसून येते. त्यामुळे एक जनहिताची बाब म्हणून सातारा शहराच्या हद्दवाढीस तातडीने मंजूरी देवून मुलभूत सोयी- सुविधांपासून वंचीत राहणाऱ्या उपनगरे व त्रिशंकू भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री फडणविस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर करु, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)