कराडचे अंदाजपत्रक मंजुर

कराड नगरपालिका : उत्पन्नाच्या बाबी वाढविण्यावर भर देण्याबाबत चर्चा

कराड – कराड नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या अंदाजपत्रकीय विशेष सभेत सन 2019-20 या वर्षासाठी एकूण 143 कोटी 62 लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी देण्यात आली. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी याबाबतची सूचना मांडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी लोकशाही आघाडी व भाजपाच्या नगरसेवकांनी उत्पन्न वाढविण्याच्या मुद्यांवर भर दिला.

दरम्यान, यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, फारुक पटवेकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे यांनी सहभाग घेतला.
सन 2019-20 च्या अंर्थसंकल्पामध्ये आरंभीच्या शिल्लकेसह जमेच्या बाजूस 75 कोटी 6 लाख 66 हजार व खर्चाच्या बाजूस 65 कोटी 97 लाख 65 हजारांचा समावेश करण्यात आला आहे.

भांडवली अर्थसंकल्प भाग दोनमध्ये आरंभीच्या शिल्लकेसह 68 कोटी 55 लाख 70 हजार व खर्चाच्या बाजूस 54 कोटी 15 लाख 1 हजार रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. असे एकूण 143 कोटी 62 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच महसुली अर्थसंकल्पामध्ये 9 कोटी 9 लाख 1 हजार व भांडवली अर्थसंकल्पामध्ये 14 कोटी 40 लाख 69 हजार रुपये शिल्लक दर्शविण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातील उत्पन्नामध्ये प्रामुख्याने संकलीत कर, पाणीकर, जलनि:सारण कर, शॉपिंगसेंटर भाडे, हातगाड्यांचे मासिक भाडे व विविध कामासाठी मिळालेली महसुली अनुदाने आदींचा समावेश करण्यात आला असल्याचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले.

लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील व वैभव हिंगमिरे यांनी या अर्थसंकल्पामध्ये पालिकेचे उत्पन्न वाढीबाबत फारसा विचार केला नसल्याचे सांगितले. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने इनोव्हेटीव्ह गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. उत्पन्नापेक्षा पालिकेचा खर्च जास्त दिसत आहे हे सांगत असतानाच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काही मुद्देही त्यांनी सभागृहात मांडले. त्यावर विचार करून पालिकेचे उत्पन्न आणखी वाढविता येऊ शकते असे ते म्हणाले.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन झाल्यानंतर अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सर्व विषय समिती सभापती, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, खातेप्रमुख यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. डॉ. अतुल भोसले, ना. शेखर चरेगांवकर, जिल्हाधिकारी यांनी पालिकेस निधी मिळवून दिल्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. यामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे नाव जाणूनबुजून वगळल्याचा आरोप ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांनी केला. यावर नगराध्यक्षा शिंदे यांनी चुकून राहिले आहे. त्यांच्या नावाचा समावेश करु असे सांगून वेळ मारुन नेली. यावेळी पावसकर यांनीही अंदाजपत्रकाला आमचा विरोध नाही. सत्ताधाऱ्यांनी अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसाठी ज्या गोष्टींचा समावेश केला आहे. त्या बाबी म्हणजे दात टोकरुन पोट भरल्यासारखे असल्याची टीका केली. एकूणच सन 2019-20 सालासाठी पालिकेने बनविलेल्या शिल्लकी अंदाजपत्रकास काही अपवाद वगळता एकमताने मंजुरी देत सभा खेळीमेळीत पार पडली.

मुद्रांक शुल्काचे अपयश कोणाचे

लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी उत्पन्न वाढीबाबत बोलताना सन 2013-14 रोजी पालिकेचे मुद्रांक शुल्क 10 लाख 80 हजार मिळाल्याचे सांगितले. सन 2014-15 साली तेच शुल्क 51 लाख तर सन 2015-16 साली 49 लाख मिळाले आहे. मात्र त्यानंतर एकही रुपाया मुद्रांक शुल्कापोटी पालिकेस मिळालेला नसल्याचे सभागृहात सांगीतले. याबाबत आपण पाठपुरावा करणे गरजेचे होते. तो पाठपुरावा केला गेलेला नाही हे अपयश कोणाचे आहे असा प्रश्‍न उपस्थित केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)