संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग 10 (अ ) च्या पोटनिवडणुकीत आपल्या पत्नीला नगरसेवक बनविण्यासाठी मागील निवडणुकीतील शिल्लक एबी फॉर्मचा गैरवापर केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संगमनेर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांना शहरप्रमुख पदावरुन पदमुक्त केल्याची माहिती माहिती उत्तर नगरचे संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली.
संगमनेर नगरपालिकेच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग 10 (अ) मध्ये 23 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या प्रभागातून वरिष्ठांना विश्वासात न घेता कतारी यांनी त्यांची पत्नी कविता भीमराज गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. संगमनेर शिवसेनेसह मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही परस्पर घेतलेल्या या निर्णयाबाबत उघड नाराजी व्यक्त केली. तसेच जुने शिवसैनिक व उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, शिवसेनेचे उत्तर नगर संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे संगमनेरात दाखल झाले व त्यांनी स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांशी विचारविनीमय करुन, या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने कविता सुरेश तेजी यांना उमेदवारी जाहीर केली.
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कविता गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज परस्पर दाखल करताना कतारी यांनी 2016 साली झालेल्या पालिकेच्या निवडणुकीतील शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांची सही असलेल्या एबी फॉर्मचा वापर केला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता सुरेश तेजी यांच्यासह आमदार दराडे, उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर, भाजपा नेते ऍड. श्रीराम गणपुले व युतीचे कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी गेले असताना, कविता गुंजाळ यांच्या उमेदवारी अर्जासह अनिल देसाईंच्या सहीचा एबी फॉर्म जोडल्याची बाब सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे पदाधिकाऱ्यांनी थेट अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला. अनिल देसाई यांनी या प्रकरणा बाबत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, अमर कतारी यांना शहरप्रमुख पदावरुन पदमुक्त करण्याचे आदेश दिले. संगमनेर शिवसेनेचे शहर प्रमुखाचे रिक्त पद निवडणुकीनंतर भरणार असल्याची माहिती आमदार दराडे यांनी दिली.