अबाऊट टर्न : स्फोट…

हिमांशू

“नीरव शांतता’ कशाला म्हणतात, हे परवा सोदाहरण समजलं. शेकडो डायनामाइटचा स्फोट करून नीरव मोदीचं घर पाडल्याची बातमी स्फोटकाच्या आवाजासारखी कानावर येऊन आदळली; पण दुसऱ्याच दिवशीची शांतता त्याहून अधिक “स्फोटक’ ठरली. “नो कॉमेन्ट्‌स’ हा त्या शांततेत उद्‌गारलेला शब्द कानठळ्या बसवणारा ठरला. नीरव मोदीचा अलिबागचा बंगला पाडल्याची दृश्‍यं टीव्हीवर बघून अनेकांना गलबलून आलं. कोट्यवधी रुपयांचा एवढा सुंदर बंगला जमीनदोस्त करायला नको होता. त्याऐवजी तो गरजूंना राहण्यासाठी दिला असता तरी चाललं असतं, त्या बंगल्यात वृद्धाश्रम काढला असता तर अनेकांना आसरा मिळाला असता, अशा कॉमेन्ट्‌स आल्या. काहींना तर तो बंगला विकून नीरव मोदीचं कर्ज वसूल करण्याचीही कल्पना सुचली. (म्हणजे, सरकारला तशी कल्पना का सुचली नाही, याचं आश्‍चर्य काहींना वाटलं.) परंतु कॉमेन्ट्‌स करणाऱ्यांना कदाचित सीआरझेड म्हणजे कोस्टल रेग्युलेटरी झोनची कल्पना नसावी. समुद्राच्या भरतीरेषेपासून ठराविक अंतरावर या कायद्यान्वये बांधकामांना बंदी असते. अर्थात, हा कायदा मोडणारा आणि डायनामाइटच्या स्फोटात बंगला गमावणारा नीरव मोदी एकटाच आहे का, हेही तपासायला हवंच. अर्थात, बंगला पाडण्याच्या प्रक्रियेची माहिती अनेकांना मनोरंजकही वाटली. नीरवच्या बंगल्यात शेकडो छिद्रं पाडून त्यात डायनामाइट्‌स पेरण्यात आले आणि एकदम स्फोट करण्यात आला. जागच्या जागी बंगला कोसळून पडला.

एकीकडे नीरवचा बंगला पाडल्याची दृश्‍यं दिसत असताना, त्याला स्वतःला या घटनेमुळं काहीच फरक पडलेला नाही, हेही दिसून आलं. लंडनमधल्या “द टेलिग्राफ’ दैनिकाच्या प्रतिनिधीनं बऱ्याच दिवसांपासून लापता असलेल्या नीरवचा शोध लावला. लंडनमधल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये तो आरामात राहतोय, हे ऐकून आदल्या दिवशीच्या स्फोटाचा धमाकासुद्धा लाजला! नीरवला हिरे व्यापारी म्हणावं की मूर्तिमंत “हिरा’ म्हणावं, हे दैनिकाच्या प्रतिनिधीला समजेना. कारण त्यानं केलेल्या प्रश्‍नांच्या सरबत्तीमुळं नीरव थोडासुद्धा विचलित झाला नाही. एक अक्षर बोलला नाही. या प्रतिनिधीनं नीरवला त्यानं घेतलेल्या कर्जासंबंधी प्रश्‍न विचारले.

त्याचा शोध घेतला जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारली. “लंडनमध्ये किती दिवस मुक्‍काम..?’ असंही विचारून पाहिलं. पण या सगळ्यांना “नो कॉमेन्ट्‌स’ एवढंच उत्तर देऊन नीरव गप्प राहिला. कुठल्याशा महागड्या ब्रॅंडचं नीरवनं घातलेलं जाकीट किमान दहा लाख रुपये किमतीचं आहे, असं वर्णन वृत्तपत्र प्रतिनिधीनं केलंय. अर्थात, कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर मिळालं नाही, तर पत्रकार छापणार तरी काय म्हणा! अर्थात, ही वर्णनात्मक बातमीही अनेकांचे कान उभे करणारी ठरली असणार, यात शंकाच नाही. आलिशान फ्लॅटपासून टॅक्‍सीपर्यंत पाठलाग करताना विचारलेल्या असंख्य प्रश्‍नांना नीरवनं उत्तर आणि किंमत दिली नाही.

“रेड कॉर्नर नोटीस’ बजावल्यानंतरसुद्धा माणसं इतकी आरामात आणि सुखा-समाधानात राहू शकतात, याचंच अनेकांना आश्‍चर्य वाटलं. अहो, आम्ही मागे एकाच्या पर्सनल लोनसाठी जामीनदार राहिलो होतो, तेव्हा त्या सद्‌गृहस्थानं तीन हप्ते थकवल्यावर त्याची पतसंस्था नोटीस काढून आमचा बॅंक अकाउंट “ब्लॉक’ करत होती. सबब, छोटी कर्ज घेणाऱ्या कर्जदारच नव्हे तर जामीनदारांनाही जिथं टेन्शनमध्ये राहावं लागतं, अशा देशातल्या लोकांना नीरवचे “नो कॉमेन्ट्‌स’ हे शब्द बंगल्याच्या स्फोटापेक्षा स्फोटक वाटणारच!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)