पुणे – राज्यशासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत पुणे महापालिकेकडून यंदा सुमारे दीड लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जागांची निश्चिती करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दि.1 जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ही झाडे लावली जाणार आहेत.
महापालिकेने मागील वर्षी सुमारे 75 हजार झाडे लावली होती. यंदा हे उद्दिष्ट दुप्पट करण्यात आले आहे. त्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालये, उद्यान विभाग तसेच मालमत्ता व्यवस्थापन आणि पथ विभागाकडून जागांची माहिती मागविण्यात आली होती. ही यादी तयार करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय वृक्षलागवड केली जाणार आहे. याशिवाय शहरातील काही खासगी सोसायट्यांनीही यंदा वृक्षलागवडीसाठी संमती दिली असून त्यांच्या रिकाम्या जागांमध्येही वृक्षारोपण होणार आहे. यंदाही स्मार्ट सिटी, महामेट्रो तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असून यंदा लोकसहभागही वाढविण्यावर भर देण्यात येणार आहेत.