अभिजीत बिचुकलेची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी

कोल्हापूर: चेक बाउन्सप्रकरणी जामीन मिळालेल्या आणि 2012 मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या तसेच “बिग बॉस’ या रिऍलिटी शोचा स्पर्धक राहिलेल्या अभिजीत बिचुकलेची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बिचुकलेचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून तो फिट असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर सकाळी 11 वाजता त्याला न्यायालयात हजर केले गेले. यावेळी न्यायालयाने बिचुकलेला चेक बाउन्स प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, 2012 मध्ये फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.

अभिजीत बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का ? याची पडताळणी केली असता, खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगी जिल्हा रूग्णालयातील कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान त्याला जामीन मिळेल अशी आशा बिग बॉसच्या प्रेक्षकांना होती. मात्र या खटल्याची पुढील सुनावणी दि.27 जून रोजी होणार आहे. तर डॉक्‍टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो फिट असल्याचे सांगितल्यानंतर संध्याकाळी त्याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)