“बिग बॉस’च्या घरामधूनच अभिजीत बिचुकलेला अटक

सातारा – साताऱ्याचे राजकीय व कवी मनाचे नेते आणि कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेत असलेला स्पर्धक अभिजित बिचुकले यांला शुक्रवारी मुंबईत मालिकेच्या सेटवरच अटक केली. सातारा जिल्हा पोलिसांनी धनादेश न वटल्याच्या प्रकरणात बिचुकले याच्यावर मुंबईत जाऊन ही कारवाई केली.

संध्याकाळी त्याची रवानगी लॉकअपमध्ये केली. त्याला उद्या शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित बिचुकले यांनी संदीप संकपाळ यांना एका व्यवहारापोटी 28 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, धनादेश न वटल्यामुळे संकपाळ यांनी सातारा शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.

या प्रकरणी सातारा न्यायालयाने बिचुकले याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी सकाळी मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले.

बिचुकले याला संध्याकाळी पोलिसांनी साताऱ्यात आणून त्याची कोठडीत रवानगी केली. बिचुकलेला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कलर्स वाहिनीच्या या कार्यक्रमात बिचुकले कायम राहणार की त्यांचा प्रवास इथेच थांबणार हा विषय आता चर्चिला जाऊ लागला आहे.

बिग बॉसची स्पर्धक रुपाली भोसलेला शिवीगाळ केल्याने भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकले याची हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आधीच चर्चेत असलेल्या बिचुकलेंच्या वाटचालीत चेक बाऊन्स प्रकरणाचा ब्रेक लागला असून त्याची साताऱ्यात दिवसभर चर्चा होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here