सातारा – धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेला साताऱ्यातील कवी मनाचा नेता अभिजित बिचुकले याची अखेर कळंबा कारागृहात रवानगी झाली. शुक्रवारपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला न्यायालयाने धनादेशप्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र, सन 2012 मध्ये त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात बिचुकलेचा जामीन न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून तो जिल्हा रुग्णालयात दाखल होता. मात्र, आज सोमवारी बिचुकेलची कळंबा कारागृहात रवानगी झाली.
शुक्रवारी सातारा पोलीसांनी अटक केल्यानंतर बिचुकलेला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने खंडणी प्रकरणात त्याचा जामीन फेटाळल्याने त्याला कारागृहात जावे लागणार होते. मात्र, त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवार, रविवार असे दोन दिवस प्रिझन वार्डला असलेल्या बिचुकलेला सोमवारी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला सातारा शहर पोलिसांनी कळंबा कारागृहात दाखल केले.