अब्दुल सत्तार औरंगाबादमधून अपक्ष लढवणार

मुख्यमंत्र्यांची भेट घेवून दिला आमदारकीचा राजीनामा

मुंबई – लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेल्या कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री 1.30 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच आपण औरंगाबाद लोकसभेमधून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले.

रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत सत्तार म्हणाले, मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही साडेचार वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी मदत केली आहे. म्हणूनच काल रात्री मी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच यावेळी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे.

भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव सहभागी होणार का? याबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार नाही. मी काल केवळ मुख्यमंत्र्यांची सदिच्छ भेट घेतली होती.
दरम्यान, औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन कॉंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत पक्षाला सोडचिठ्‌ठी दिली.

सत्तार यांनी कॉंग्रेसला रामराम केला आहे. याबाबत ते म्हणाले की, यापूर्वीच मी माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल, असे मला वाटत होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)