आठवण : न संपणारी गोष्ट

-विद्या शिगवण

गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या मर्मबंधातील ठेव. निदान आमच्या तरी. आजीच्या गोष्टी म्हणजे अगदी जीव की प्राण. शाळेतही ऑफ तासाला कधी गोष्टी ऐकायची संधी मिळायची. आमचे ओक नावाचे एक शिक्षक होते. ते फार छान गोष्टी सांगायचे. केवळ ऑफ तासाला नाही, तर त्यांच्या नियमित तासालाही कधी मधी गोष्टी सांगायचे.

अरेबियन नाईट्‌समधल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आजही आठवतात. अलीबाबा 40 चोर, अल्लादिन जादूचा दिवा, झोपी गेलेला जागा झाला, समुद्रात जन्मलेली गुलनार आणि तिचा मुलगा बादर बसिन, सिंदबादच्या सफरी अशा अनेक गोष्टी आम्ही ओक सरांकडून ऐकल्या,पाचवी-सहावीत असताना.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदा त्यांना आमच्या वर्गातील मुले म्हणाली, सर एक खूप मोठी गोष्ट सांगा. तर ते म्हणाले, न संपणारी गोष्ट सांगू का? मुले अगदी उत्साहाने हो।।।। म्हणाली.

सर सांगू लागले. एक राजा होता. त्याचे धान्याचे मोठे कोठार होते. आता कोठार म्हणजे काय हे आजच्या मुलांना कळणार नाही, पण जेथे धान्य साठवून ठेवतात त्या जागेला कोठार म्हणतात हे आम्हाला तेव्हा ठाऊक होते. आणि कोठारामध्ये हजारो पोती धान्य साठवून ठेवतात. कधी नुसतीच धान्याची रास रचून ठेवतात.

तर त्या राजाच्या कोठाराला छताला एक फट होती. ती चिमण्यांनी पाहिली. त्या फटीतून एक चिमणी कोठारात आली आणि धान्याचा एक दाणा घेऊन गेली. त्यानंतर दुसरी चिमणी आली आणि दुसरा दाणा घेऊन गेली. अशा एकमागून एक चिमण्या येऊन दाणे घेऊन जाऊ लागल्या. सर सांगत, तिच्या मागून एक चिमणी आली आणि एक दाणा घेऊन गेली.

पाच सहा मिनिटात पन्नास शंभर चिमण्या येऊन एक एक दाणा घेऊन गेल्या. तेवढ्यात सगळी मुले कंटाळली. पुढे काय झाले म्हणून विचारू लागली. सर म्हणाले, अरे, अजून तर पसाभर पण दाणे चिमण्यांनी नेले नाहीत. इथे तर हजारो पोती धान्य आहे. ते संपल्याशिवाय गोष्ट पुढे जाणार कशी? आता हे कोठारातील दाणे संपेर्ऱ्यंत तुम्हाला हेच ऐकले पाहिजे.

आता मात्र सर्व मुलांना कळले की न संपणारी गोष्ट सांगायला सांगून आपण फसलो. मग त्यांनी आपली मागणी मागे घेतली आणि सरांना दुसरी गोष्ट सांगायला सांगितली.

दुसरी गोष्ट सांगण्यापूर्वी सर म्हणाले, जितक्‍या चिमण्यांच्या नावाचे दाणे होते, तेवढे दाणे त्या घेऊन गेल्या. बाकी चिमण्यांना काही त्या कोठारातील दाणे मिळणार नाहीत आपण गोष्ट संपवल्यावर. मग त्यांनी एक म्हण सांगितली, दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम.

आता हे आठवले कारण चेन्नई हायकोर्टाने दिलेला एक निकाल.

तामिळनाडूत सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ दिले जात होते. ते बंद करायला सांगताना न्यायमूर्ती म्हणाले, फुकट तांदूळ दिल्याने लोक आळशी होत आहेत. केवळ गरिबांनाच तसे धान्य दिले पाहिजे. अशाने लोक प्रत्येक गोष्ट फुकट मागतील. तेव्हा फक्त बीपीएल म्हणजे दारिद्रय रेषेच्या खालील लोकांनांच मोफत धान्य द्या. फुकट देऊन लोकांना आळशी करू नका.

गेल्यावर्षी अशा मोफत तांदूळ देण्यासाठी 2100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला. यात कोणाचा फायदा झाला? धान्याचा काळा बाजार वाढला. त्यामुळे लोकांना मोफत देण्याची सवय कमी करा.

लोकांची हाव किंवा लोभ ही न संपणारी गोष्ट आहे. तिच्यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.

हे बोलणे अगदी शंभर टक्के खरे आहे. कोणत्याही गोष्टीचा लोभ ही न संपणारी गोष्ट आहे. तिच्यावर आपले आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. तरच जीवनात माणसाला सुख आणि समाधान मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)