ईश्वर निंदेच्या आरोपावरून पाकिस्तानात झाली होती फाशीची शिक्षा
इस्लामाबाद – ईश्वर निंदा केल्याच्या कारणावरून पाकिस्तानात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली ख्रिश्चन महिला असियाबिबी ही आता तिच्या कॅनडातील कुटुंबियांकडे सुखरूप पोहचली आहे अशी माहिती तिच्या वकिलांनी दिली. खालच्या कोर्टांनी तिला फाशीची शिक्षा दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने मात्र तिची निर्दोष सुटका केली होती. सन 2010 साली तिला दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून ती आठ वर्ष कारागृहात होती.
आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती तिथे मात्र तिला दाद मिळाली. आपल्या विरोधात खोटा खटला दाखल करून आपल्याला यात गुंतवण्यात आले होते असे तिचे म्हणणे होते. न्यायालयाने तिची सर्व कथा ऐकून आणि साक्षी पुराव्यांचे पुनरावलोकन करून तिला निर्दोष ठरवल्याने ती आता पुर्णपणे मुक्त झाली असल्याने ती आता तिच्या कॅनडातील कुटुंबियांकडे गेली आहे असे तिच्या वकिलांनी सांगितले.
असियाबिबी ही पाकिस्तानातून आपल्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहचु शकली हा तेथील कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढ्याचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाकिस्तानवर आणण्यात आलेल्या दबावाचा परिणाम असल्याची प्रतिक्रीयाही त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तिची फाशी रद्द करण्यात आल्याने त्याची पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रीया उमटली होती. तेथील कट्टरपंथीयांनी देशभर उग्र निदर्शने केली होती. तसेच महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग रोखून त्यांनी देशालाही वेठीला धरले होते त्यामुळ तिची सुटका होऊ शकेल की नाही या विषयी चिंतेचेच वातावरण होते पण अखेर तिला न्याय मिळाला असून ती आता आपल्या कुटुबियांपर्यंत सुखरूप कॅनडाला पोचली आहे.
पाकिस्तानात तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने इटालिसह अनेक देशांनी तिला आपल्या देशात आश्रय देण्याची भूमिका घेतली होती. तिला पाकिस्तानातून बाहेर काढण्यासाठी जगाने मदत केली पाहिजे अशी जाहीर मागणी तिचे पती आशिक मसिह यांनी केली होती.