वयात येताना सांभाळा (भाग 1)

-मानसी चांदोरीकर

शेफालीला घेऊन तिची आई भेटायला आली. आल्यावर आईने शेफालीची आणि स्वतःची ओळख करून दिली. शेफाली नुकतीच नववीमध्ये गेली होती आणि तिची आई गृहिणी होती. शेफाली ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे जरा लाडावलेली होती. त्यांनी ओळख करून दिल्यावर तिला बाहेर थांबवण्याची परवानगी मागितली आणि तिला बाहेर नेऊन बसवले.

परत आत येऊन त्या म्हणाल्या, “शेफाली आमची एकुलती एक मुलगी. त्यामुळे आजी-आजोबा, काका-काकू, बाबांची जरा जास्तच लाडकी. ती म्हणेल मागेल ते सगळं तिला ताबडतोब मिळतं आणि नाही मिळालं तर ती हट्ट करून चिडून ते मिळवते. नाही ऐकणं तिला मान्यच नसतं. काका-काकूंना मुलं-बाळं नाहीत. त्यामुळे तेही हिचे खूप लाड करतात.

-Ads-

मी सगळ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणी माझं ऐकत नाही. सगळे नुसतं जाऊदे म्हणतात. “तिचे नाहीतर कोणाचे लाड करणार’, असं म्हणून मला गप्प बसवतात. कधी कधी तिच्या बाबांना पटतात काही गोष्टी पण इतरांपुढे त्यांचं काही चालत नाही. त्यामुळे मग ते गप्प बसतात. त्यामुळे शेफाली आणखीनच हट्टी झालीये.

गेल्या काही महिन्यांपासून शेफालीच्या वागण्यात खूप बदल झालाय. खूप चिडचिडी झालीये ती. आपण जरा काही सांगायला गेलं की लगेच चिडते-संतापते. तासन्‌तास आरशासमोर उभं राहून काही ना काही करत असते. हेअरस्टाईल, मेकअपचं साहित्य काका-काकूंनी आणून दिलंय ते काढून सारखं काहीतरी करत असते. त्यातच तिचा निम्मा वेळ जातो. आपण काही सांगायला, समजवायला गेलं की चिडते.

खरं तर पूर्वी ती खूप समजूतदार होती, पण अलीकडे खूप चिडते. सारखं टीव्ही पाहात बसायचं नाहीतर आरशासमोर उभं राहायचं. कोणाला ना कोणाला काही न काही आणायला सांगायचं आणि हो अजून एक सारखं मोबाईलवर बोलत बसायचं. कोणाशी बोलतीयेस विचारलं की एकतर उडवाउडवीची उत्तरं द्यायची नाहीतर चिडून उलट उत्तर द्यायची.

मागच्या महिन्यात तिच्या वर्गशिक्षिकांनी भेटायला बोलावलं त्यांनीही मला हेच सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून तीचं शाळेतलं वागणं बदललंय. वर्गात तिच्या मैत्रिणींबरोबर बोलत बसते. मुलांबरोबरसुद्धा बोलत बसते. परीक्षेत तिला यावेळी खूप कमी मार्क मिळालेत. अभ्यासात खूप मागे पडत चाललीये. त्यांनीच सुचवलं म्हणून मी तिला इथे घेऊन आले.’

एवढं बोलून त्या थांबल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर शेफालीच्या दोन समस्या होत्या त्या म्हणजे एक – तिचे होणारे अती/अतिरिक्त लाड आणि दुसरी म्हणजे वयात येणे. वयात येताना होणाऱ्या बदलांमुळे तिचा हट्टीपणा, अभ्यासाकडे दुर्लक्ष, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे, चिडचिड करणे ही लक्षणं/वर्तन तिच्यात नव्याने दिसू लागली होती.

अजून काही आवश्‍यक माहिती घेऊन त्यानंतर तिच्या आईला तिच्या या दोन वेगवेगळ्या समस्या समजावून सांगितल्या व त्यावरील उपायांची आखणी कशी करायची याबाबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले. पुढील सत्रात शेफालीला भेटायला बोलावले. पण या सत्रात तसेच पुढील सत्रातही ती फारसे काही बोलली नाही ती तिच्या आईवर चिडलीच होती.

वयात येताना सांभाळा (भाग 2)

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)