कार्यक्षीण  हृदय (भाग 1)

-डाॅ. बिपीनचंद्र भामरे

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर हृदय हे शरीराचा मोटर पंप असते. हृदय कार्यक्षीणता म्हणजे हृदयातील स्नायू शरीराच्या गरजेनुसार आवश्‍यक तेवढे रक्त पंप करू शकत नाहीत. हृदय कार्यक्षीण होण्याचे अनेक प्रकार असतात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला हृदयाची रचना समजून घ्यावी लागेल.

आपल्या हृदयात चार कप्पे असतात. दोन उजव्या बाजूला असतात आणि दोन डाव्या बाजूला असतात. त्यामुळे जेव्हा उजव्या बाजूचे कप्पे निकामी होतात तेव्हा उजव्या बाजूचे हृदय निकामी झाले असे म्हणतात तर जेव्हा डाव्या बाजूचे कप्पे निकामी होतात, तेव्हा डाव्या बाजूचे हृदय निकामी झाले असे म्हणतात.

त्याचप्रमाणे आपल्याला हृदयातील स्नायूंची कार्यपद्धती जाणून घ्यावी लागेल. हे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. त्यामुळे जेव्हा स्नायू आकुंचित होण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा आम्ही त्याला सिस्टॉलिक फेल्युअर असे म्हणतो आणि जेव्हा स्नायू प्रसरण पावण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला डायास्टॉलिक फेल्युअर असे म्हणतात.

कारणे :

हृदय कार्यक्षीण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे, उच्च रक्तदाब, हृदयातील झडपेला इजा होणे, हृदयाच्या स्नायूंमध्ये असाधारण कण साचणे, फुप्फुसातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन (संरोध) ही कारणे असू शकतात. यापैकी काही आजार बरे करता येऊ शकतात आणि काही प्रकारांमध्ये प्रकृती पूर्ववत होणे शक्‍य नाही. त्यामुळे हृदय निकामी होण्यासाठीचे नक्की कारण शोधून काढण्यासाठी आम्हाला पुढील चाचण्या करण्याची आवश्‍यकता असते.

लक्षणे :

लक्षणांचा विचार करता हृदय अचानक बंद पडण्याच्या क्रियेला आम्ही ऍक्‍युट हार्ट फेल्युअर म्हणतो. या परिस्थितीत तुम्ही काही तासांपूर्वीपर्यंत सामान्य असता आणि त्यानंतर तुम्हाला धाप लागते, हृदयाचे ठोके धडधडतात, श्वास अडकतो, खोकला येतो. पायाला सूज येते. तुम्हाला थकवा येतो किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. हृदयविकाराचा झटका आला असेल तर छातीत दुखते.

छातीत दुखत असेल, घेरी येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा धडधडत असतील, अचानक व खूप धाप लागत असेल आणि गुलाबी रंगाचा फेसयुक्त कफ बाहेर पडत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्‍टरकडे जावे. हृदय बंद पडण्याच्या सौम्य प्रकारांना क्रॉनिक म्हटले जाते.

जेव्हा तुम्हाला ऍक्‍युट हृदय कार्यक्षीणतेची नाट्यमय लक्षणे जाणवत नाहीत, पण तरीही हृदयक्रिया क्षीण होत असते तेव्हा तुमच्या शरीरात हळुवारपणे काही बदल होत असतात. काही दिवस तुम्हाला फार बरे वाटत असेल, तर काही दिवस अशक्तपणा जाणवत असेल आणि थकवा येत असेल. तुमचे वजनही वाढेल. वैद्यकीय भाषेत तुमच्या शरीरात पाणी साठत जाईल. आपल्या शरीरात नक्की काय बदल होतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्‍टरची भेट घ्या. दुर्लक्ष करू नका.

कार्यक्षीण हृदय (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)