-मानसी चांदोरीकर
केतन आणि सायली दोघेजण स्वत:हुनच भेटायला आले होते. स्वत:हून म्हणजे घरच्यांनी खूपच जबरदस्तीने त्यांना समुपदेशनासाठी पाठवले होते. दोघांना येथे याचचेच नव्हते. ते नाईलाज म्हणून येथे आले होते हे त्यांनी आल्या आल्याच स्पष्ट सांगितले. त्या दोघांबरोबर केतनचे वडील देखील आले होते. ते दोघेही त्यांच्यावर चिडले होते. पण त्यांच्यासमोर आणखी काही बोलण्याची दोघांची कदाचित हिंमत नव्हती म्हणून दोघे गप्प बसले होते.
केतनच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम स्वत:ची ओळख करून दिली. ते एका सरकारी पदावरून निवृत्त झाले होते. केतन हा त्यांचा मुलगा तर सायली त्यांची सून. त्या दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. सुरुवातीचे वर्ष छान गेले. पण नंतर दोघांमधले वाद हळूहळू वाढायला लागले.
वादाचे रूपांतर भांडणात होत गेले आणि आता घरातल्या कोणालाही विश्वासात न घेता दोघांनी परस्पर घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. सायली माहेरी निघून गेली. तिच्या घरच्यांना तर हे ऐकून धक्काच बसला. ते तिला घेऊन केतनच्या घरी आले. तेव्हा केतनच्या घरच्यांना सर्व कळले आणि त्यांनाही मोठा धक्का बसला. त्या दोघांची भांडणे होत असली तरी या निर्णयापर्यंत जातील असं कोणालाच वाटलं नव्हंत.
दोन्ही घरातील माणसे त्यांच्या या निर्णयाने घाबरली होती व नाराजही झाली होती. त्यांनी दोघांना खूप समजावले पण तरीही केतन आणि सायली आपल्या निर्णयावर ठाम होते. बरच प्रयत्न करूनही दोघेही ऐकायला तयार नाहीत म्हणून त्यांना समुपदेशनासाठी नेण्याचे सर्वांनी ठरवले आणि म्हणूनच केतनचे वडील त्यांना घेऊन आले होते.
या सत्रादरम्यान दोघांनाही बोलण्यात विशेष रस नव्हता. त्यामुळे या सत्रात तिघांकडून केवळ महत्त्वाची अधिक माहिती घेतली व पुढच्या सत्रासाठी स्वतंत्रपणे भेटावयास सांगितले. केतन सुरुवातीला तयारच नव्हता; पण वडिलांमुळे तो तयार झाला. त्यानंतरचे प्रथम सत्र सायलीबरोबर घेण्याचे ठरले.
सायली सत्रासाठी आली. ती आल्यावर तिने प्रथम स्वत:ची ओळख करून दिली. सायली आणि केतन दोघेही आय. टी. क्षेत्रात काम करतात. दोघांचे लग्न रितसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन ठरले. लग्न ठरल्यापासून महिन्याभरातच त्यांचे लग्न झालेही. 15 दिवस छान फिरून आल्यावर दोघांचे वैवाहिक आयुष्य जबाबदाऱ्यांसह खऱ्या अर्थाने सुरू झाले. आणि मग एकमेकांच्या स्वभावातले उन्नीस-बीस दोघांना कळायला लागले.
मग हळूहळू वाद व्हायला लागले. सायलीच्या सांगण्यानुसार तिला स्वत:ला घर, स्वत:ची खोली स्वच्छ निटनेटकी ठेवायला आवडते. एकही वस्तू इकडे तिकडे झालेली तिला अजिबात खपत नाही आणि केतनबरोबर याच्या उलट स्वभावाचा. त्याचा टॉवेल, शर्ट-पॅंट वस्तू कशाही पडलेल्या असतात.
सकाळी नुसती शोधाशोध आणि चिडचिड, आरडाओरडा. तो चिडतो म्हणून आई धावत येऊन त्याला सगळं हातात देतात. मला हे अजिबात आवडत नाही. या बरोबर त्याच्या आणखी दोन तक्रारी म्हणजे पैशाची उधळपट्टी आणि कामांची जबाबदाऱ्यांची चालढकल. त्याचीही तिने अनेक उदाहरणे दिली. पुढील सत्र केतन बरोबर घेतले. त्यातही त्याने सायलीचेच मुद्दे सांगितले. तिला अतिस्वच्छता आवडते. मला ते नाही जमत मग ती चिडते. मी ब्रॅंडेड वस्तू वापरतो. मला खूप आवडते. पण तिला ती पैशाची नासाडी वाटते. आणि प्रत्येक काम तिने सांगितले की ताबडतोब झालेच पाहिजे असा तिचा अट्टाहास असतो.
मॅडम मला पण ऑफिसची, इतर कितीतरी कामे असतात. हिच काम प्रत्येकवेळी सांगितल्या सांगितल्या मी कसं करू शकेन. घरच्यांनी किती समजावलं पण ही काहीच ऍडजेस्ट करायला तयार नाही. मग मला पण राग येतो. आणि आता तर तिला मुल हवंय म्हणून रोज मागे लागते. भंडावून सोडलयं. मी अजून या गोष्टीसाठी कोणत्याही दृष्टीने तयार नाही.
दोघांच्याही भांडणाचे मुद्दे फार गंभीर किंवा मोठे नव्हते. लग्नाआधी मिळालेला अपुरा वेळ. महत्त्वाच्या विषयांवर असणाऱ्या मोकळ्या, शांत संवादाचा अभाव आणि जोडीदारासाठी ऍडजेस्टमेंट करण्याची नसलेली तयारी यामुळे हे वाद घडत होते. आणखी 2-3 सत्र झाल्यावर नंतरची सत्रे दोघांची एकत्र घेतली व या मुद्यांची त्यांना जाणीव करून दिली. दोघांनाही नक्की बदल कुठे आणि कसा करायचा ते समजलं आणि त्यांच्यातलं नातं फुलत गेलं.
(केसमधील नावे बदलली आहेत)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा