नवी दिल्ली – दिल्लीतील निवडणूक प्रचार थांबला आहे. उद्या तेथे मतदान आहे. पण या काळात आम आदमी पक्षाचे लोक फोनवरून मतदारांना खोट्या जनमत चाचण्यांचे निकाल ऐकवून लोकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. या संबंधात दिल्ली प्रदेश कॉंग्रेस समितीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यांनी आपल्या समर्थनार्थ आप कडून ऐकवले जाणारे टेलिफोन रेकॉर्डिंगच आयोगाला सादर केले आहे.
पुर्व दिल्ली मतदार संघातील कॉंग्रेसच्या उमेदवार शीला दीक्षित यांच्या निवडणूक प्रतिनिधी रोमीला धवन यांनी आयोगाकडे ही तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत आप पक्षाचे नाव घेतलेले नाहीं. पण नंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे नाव घेऊन त्यांच्यावर हा आरोप केला आहे. मतदारांना असे फोन कॉल करण्यासाठी आम आदमी पक्षाने कॉल सेंटरच सुरू केल्याचा दावाहीं त्यांनी केला आहे.