#कानोसा : मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 3)

-प्रा. पोपट नाईकनवरे

देशभरातील आमदारांच्या वार्षिक उत्पन्नाबाबत दोन अभ्यास अहवाल आले आहेत. या अहवालांनी राजकारणाची काळी बाजू उघड केली असून, राजकारण्यांच्या आमदनीत कशी झपाट्याने वाढ होते, हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, अधिक शिकलेल्या आमदारांपेक्षा कमी शिक्षण असलेल्या आमदारांचे उत्पन्न अधिक आहे, हा या अभ्यासाचा धक्‍कादायक निष्कर्ष आहे. ही माहिती पाहता “जवा बघतो मी तुमचं उत्पन्न, मला आमदार व्हावंसं वाटतंय’ असं सुधारित गाणं सर्वसामान्य गुणगुणत असल्यास नवल नाही !

हे कोडे सोडविण्याचा सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे राजकारण्यांच्या एकंदर संपत्तीचा आणि उत्पन्नाचा अभ्यास.लोकप्रतिनिधी हे गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करीत असले तरी ते स्वतः मात्र श्रीमंत असणारच, हे आजकाल उघडपणे गृहित धरले जाते. जेव्हा-जेव्हा असे उघडपणे मान्य केले जाते तेव्हा-तेव्हा त्याचा संबंध सार्वजनिक जीवनात सातत्याने वाढत असलेल्या भ्रष्टाचाराशीच असतो. अर्थात, सर्वच लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारी ठरविणे चुकीचे आहे, हे मान्य. परंतु भ्रष्टाचाराचा नेत्यांच्या कमाईशी संबंध नाहीच, असेही खात्रीने सांगता येत नाही.

काही वर्षांपूर्वी ज्या मोजक्‍या चांगल्या गोष्टी भारतीय लोकशाहीत घडल्या, त्यातली एक म्हणजे नेत्यांना त्यांच्या मिळकतीचा तपशील जाहीर करण्याची झालेली सक्ती. त्यामुळे कमीत कमी नेतेमंडळींचे (दाखविण्याजोगे) उत्पन्न तरी जनतेला दिसू शकते. मुद्दा असा की, दिसले तरी ते “पाहिले’ जाते का? एडीआरने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 941 आमदारांचा समावेश करता आला नाही, याचे कारण म्हणजे या महाभागांनी अद्याप आपल्या उत्पन्नाबाबतचा तपशील सादरच केलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की, हे “सरासरी’ उत्पन्न असल्यामुळे हे चित्र प्रातिनिधिक असले तरी ते स्पष्ट आहे असे म्हणता येणार नाही.

आमदारांचे जे सरासरी वार्षिक उत्पन्न दिले आहे, त्यापेक्षा कमी कमाई असणारे आमदारही असतीलच. परंतु त्याचाच दुसरा पैलू असा की, या सरासरीपेक्षा कितीतरी अधिक कमाई करणारे आमदारही आहेतच. आमदारकी मिळाल्यानंतर माणसाची “किंमत’ वाढते असे म्हटले जाते. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या अनेक प्रसंगांवेळी आमदारांना अज्ञात ठिकाणी न्यावे लागते, हेही आपण उघडपणे पाहतो. आमदारांची खरेदी-विक्री केली जाते, हे त्यावरून स्पष्ट होते. नेत्यांच्या उत्पन्नाविषयीचा हा अभ्यास आणखी एका बाबतीत प्रातिनिधिक मानता येतो. या अभ्यासानुसार, दक्षिणेकडील आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न उत्तरेकडील राज्यांमधल्या आमदारांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले आहे.

देशाच्या संपन्नतेचा भौगोलिकदृष्ट्या आढावा घेतल्यास हेच चित्र दिसून येते. याचा अर्थ, सर्वसामान्य माणसांचे उत्पन्नदेखील दक्षिणेत अधिक आणि उत्तरेत कमी असल्याचे दिसते. राजकारण्यांच्या उत्पन्नांची ही आकडेवारी महत्त्वपूर्ण असली, तरी दुर्दैवाने ती राजकारणाच्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे चित्र दाखवून देण्यास उपयुक्त ठरत नाही. कारण हे असे उत्पन्न आहे, जे नेत्यांनी हिशेबपुस्तकात नोंदविलेले आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेल्या पैशांची नोंद करता येत नाही. त्यालाच आपण काळा पैसा म्हणतो. त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला राजकारणाचे चित्र दाखविण्यास पुरेशी ठरत असली, तरी कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत घेऊन जाऊ शकत नाही. अंदाज मात्र बऱ्याच प्रमाणात येतो, हे मान्य करायला हवे.

मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 1)    मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)