“आरटीओ’मध्ये अखेर स्वच्छता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाच्या सहकार्याने अभियान
पुणे – “अस्वच्छता’ अशी जणू ओळख झालेला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परिसर.. सुट्टीचा दिवस.. आवर्जून स्वयंसेवक, आरटीओचे अधिकारी वर्गांचा सहभाग… आणि काही वेळानंतर “स्वच्छ झालेला परिसर असे वातावरण संगम पूल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळाले. निमित्त होते स्वच्छता अभियानाचे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रायगडच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कार्यलय आणि कार्यालयाच्या परिसरामध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल 15 टन कचरा गोळा करण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कचरा इतरत्र न टाकता कचरापेटीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
परिवहन कार्यालयामध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कागद, प्लॅस्टिकच्या बॉटल्स आदी प्रकाराचा कचरा आवारामध्येच टाकण्यात येतो. त्याचबरोबर गुटख्यासारखे पदार्थ थुंकून परिसर अस्वच्छ करण्यात येतो. परिणामी कार्यालयाच्या स्वच्छतेबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
स्वच्छता अभियानामध्ये प्रतिष्ठानचे सुमारे 436 स्वयंसेवक, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासह वाहन वितरक, वाहतूकदार प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अभियानासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक वाहने आणि कर्मचारीवर्ग उपलब्ध करुन देण्यात आला होता.